गोष्ट एका जिद्दीची ! 8 वर्षांपासून गवंडीकाम करणारा सुमित बनला ‘कलेक्टर’

0
1222

मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील सुमित विश्वकर्माने आयएएस परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. सुमितच्या या यशाबद्दल अवघ्या मध्य प्रदेशला कौतुक आहे. कारण, गरिबीचे चटके सोसत आणि परिस्थितीशी दोन हात करत सुमितने हे यशाचे एव्हरेस्ट पार केले आहे. दिवसा वडिलांसोबत मिस्त्री काम करुन रात्री 8 ते 10 तास अभ्यास, असा दिनक्रम सुमितचा असे. सुमितच्या या यशानंतर त्याच्या गावात उत्साह असून अनेकांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील घंसौर तालुक्यातील एका 250 वस्ती असलेल्या गावचा रहिवासी असलेल्या सुमित विश्वकर्माने युपीएससी परीक्षेत 53 वी रँक मिळवली आहे. सुमित बांधकामावर मिस्त्रीकाम करणाऱ्या कामगार बापाचा मुलगा आहे. तर, त्याने स्वत:ही बांधकाम क्षेत्रात मजदूर बनून काम केलं आहे. बांधकामावर मजदुरीचे काम करतच, त्याने या यशाला गवसणी घातली आहे. मध्य प्रदेशमध्ये बांधकाम करणाऱ्या सुमितला ‘मिस्त्री’ असे संबोधतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि जिद्दीवर सुमितने यंदा युपीएससी परीक्षा क्रॅक केली. आपल्या मुलाखतीवेळी सुमितला OK या शब्दाचा अर्थ विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, सुमितने Objection killed असे वेगळ्याच धाटणीचे उत्तर दिले. आपल्या याच वेगळ्या विचाराच्या जोरावर सुमितने अशक्य ते शक्य करुन दाखवले. ज्या कॉलेजमध्ये सुमितने शिक्षण घेतले, त्याच कॉलेजमध्ये सुमित मजदुरीचे काम करत होता.
सुमितचे जीवन म्हणजे एका संघर्षाची गाथा आहे. आपल्या वडिलांसोबतच सुमितने मिस्त्रीचे काम केले आहे. विशेष म्हणजे ज्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सुमितने बीई पूर्ण केले, त्याच कॉलेजमध्ये गवंडीकामही करण्याचं धाडस सुमितनं दाखवलं. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये अनेक कंपन्यांकडून त्याला नोकरीची ऑफर आली होती. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे गाव सोडून नोकरीला जाणे सुमितला शक्य नव्हते. त्यावेळी, एका कॉलेजमध्ये सुमितला नोकरी मिळाली, पण काही कारणामुळे रेग्युलर न जाता आल्याने त्यास नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे अखेर गवंडीकाम (मिस्त्री) म्हणून काम करण्याचा धाडसी निर्णय सुमितने घेतला. आपल्या वडिलांसोबत गेल्या 8 ते 9 वर्षांपासून मी मजदुरीचे काम करत असल्याचे सुमितने आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. मात्र, हे करत असताना सरकारी नोकरी मिळविण्याचं ध्येय मी कधीही सोडलं नाही. मी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षाही दिली. पण, तिथे यश न मिळाल्याने पुन्हा युपीएससी परिक्षेच्या तयारीला सुरुवात केल्याचं सुमितनं सांगितलं. या कामी सुमितचा भाऊ आणि त्याचे वडिल ज्यांच्याकडे काम करत होते, त्या विजय यादव यांनी त्यास मोठी मदत केली. विशेष म्हणजे, विजय यादव यांनीच सुमितचे लग्नही जमवले होते.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here