⁠  ⁠

गुगलनं प्ले स्टोअर्समधून हटवलं यूसी ब्राउजर अॅप

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

चीनच्या अलिबाबा ग्रुपने तयार केलंल यूसी ब्राउजर अॅप गुगलनं प्ले स्टोअर्समधून हटवलं आहे. भारतात डाऊनलोड केलं जाणारं यूसी ब्राउजर हे सहाव्या क्रमांकाचं अॅप आहे. जगभरात या अॅपचे ४२ कोटी यूजर्स आहेत. त्यातील १० कोटी एकट्या भारतातील आहेत. मात्र हे अॅप हटविण्यात आलं असलं तरी ‘यूसी ब्राउजर मिनी’ आणि ‘न्यू यूसी ब्राउजर’ हे दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअर्समध्ये कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्य यूसी ब्राउजर अॅप का हटविण्यात आलं याचं कारण अद्यापपर्यंत गुगल किंवा यूसी ब्राउजरकडून देण्यात आलेलं नाही. गुगलने यापूर्वीही डाटा जमा करत असल्याचा आरोप अलिबाबा कंपनीवर लावला होता. त्याच कारणामुळे यूसीला प्ले स्टोअर्समधून हटविण्यात आलं असावं असं सूत्रांचं म्हणणं आहे. यूसी ब्राउजर जमा केलेला सर्व डाटा चीनला हस्तांतरीत करत असल्याची माहिती ऑगस्टमध्ये लिक झाली होती. त्यावर आक्षेपही घेण्यात आला होता. यूसी ब्राउजरद्वारे मोबाइलधारकाची व्यक्तिगत माहिती, स्थान, सर्च डिटेल्स आणि सबस्क्राइब डिव्हाइस नंबरची माहिती मिळू शकते, असं कॅनडाच्या एका संशोधकानं दावा केला होता. त्यावर या कंपनीनं खुलासाही केला होता.

Share This Article