विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा – अभ्यासाचे नियोजन

4
mpsc-sti-exam-plan

mpsc sti exam plan min विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा – अभ्यासाचे नियोजन

विद्यार्थी मित्रांनो गेल्या लेखात आपण विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप आणि प्रश्नपत्रिका विश्लेषणाची प्राथमिक माहिती पाहिली. आज आपण अभ्यासाचे नियोजन करताना पार कराव्या लागणाऱ्या टप्प्यांची सविस्तर माहिती घेऊयात.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या परीक्षांचे वेगळेपण. पदवीपर्यंत दिल्या गेलेल्या शाळा-कॉलेजांतील परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामुख्याने खालील फरक दिसून येतो.

या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात, परंतु आयोगाच्या अपेक्षा जाणून घेऊन जर योग्य रणनीती अमलात आणली तर या अवघड वाटेवरचा प्रवास नक्कीच पूर्ण करता येतो. आयोग विद्यार्थ्यांशी फक्त तीनच माध्यमांतून संवाद साधतो.

१. अभ्यासक्रम
२. प्रश्नपत्रिका
३. निकाल

आयोगाने या तीन माध्यमांतून जे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहेत त्यांचा योग्य अन्वयार्थ ज्याला लावता येतो तो या स्पर्धा परीक्षांची बाजी मारून जातो. म्हणूनच विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूयात.

पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम :-
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इ.

५. अर्थव्यवस्था –

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशात्र (झुऑलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी सांगड या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी २०१३ सालापासून अर्थात परीक्षेचे स्वरूप बदललेल्या सालापासून आत्तापर्यंत STI, PSI U Assistant (साहाय्यक कक्ष अधिकारी) या पदांसाठी झालेल्या सर्व पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे. (STI, PSI U व साहाय्यक कक्ष अधिकारी या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे गेल्या तीन वर्षांतील या सर्वच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे सुकर होऊ शकते) या प्रकारचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर अधिक भर द्यायचा आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यायचा याचा अंदाज येऊ शकतो आणि आपली अभ्यासाची रणनीती निश्चित करता येते.

* अभ्यासक्रमाची तीन गटांत विभागणी

प्रत्यक्षात अभ्यासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी विषयानुरूप अभ्यासक्रमातील मुद्दय़ांची तीन विभागांत विभागणी करावी.

अ) विभाग १ – यामध्ये त्या विषयामधील ज्या ज्या उपघटकांवर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले आहेत त्या सर्व घटकांचा समावेश करणे. उदा. इतिहास या विभागांतर्गत २०१६ साली विचारलेला प्रश्न – परमहंस सभेची पुढीलपकी कोणती उद्दिष्टे होती? हा प्रश्न ‘परमहंस सभेच्या उद्दिष्टांवर’ असल्यामुळे ‘परमहंस सभा’ हा इतिहास या घटकातील विभाग १ अंतर्गत येणारा घटक होय.

ब) विभाग २ – परमहंस सभेप्रमाणे इतर सामाजिक संस्था ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारणेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. उदा. सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, इ. त्यांची उद्दिष्टय़े, स्थापना, स्थापनाकार, इ.

क) विभाग ३ – वरील दोन विभागांमध्ये समाविष्ट न झालेले अभ्यासक्रमाचे मुद्दे या विभागामध्ये समाविष्ट करावेत. वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाची विभागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या मुद्दय़ावर कितपत भर द्यावा आणि त्या मुद्दय़ावर प्रश्न कसा येऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पहिल्या दोन विभागांतील घटकांवर ७० ते ७५ टक्के प्रश्न येतात आणि उर्वरित प्रश्न हे तिसऱ्या विभागावरील असतात, त्यामुळे अभ्यास करताना पहिल्या दोन विभागांतील घटकांवर अधिक भर द्यावा आणि त्या घटकांतील सर्व आयामांची चोख उजळणी करावी.

निकालाचे विश्लेषण केल्यास आपल्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे पूर्वपरीक्षा असो वा मुख्य परीक्षा असो तुम्ही ५० टक्क्यांपर्यंत जरी पोहोचू शकलात तर तुम्हाला पद मिळण्याची शाश्वती नक्कीच असते. त्यामुळे योग्य अभ्यासघटकांची निवड, त्यांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड आणि निवडलेल्या घटकांचा सारासार अभ्यास व उजळणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासस्रोतांबद्दल आपण पुढील लेखांत चर्चा करूयात.

(हा लेख वसुंधरा भोपळे यांनी दैनिक लोकसत्ताच्या ‘करियर वृत्तांत’ या सदरात लिहला आहे.)

विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here