⁠  ⁠

देशातील मोठ्या कंपन्यांचा चालू तिमाहीतला नफा

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 3 Min Read
3 Min Read
लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) – देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) कंपनी लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) चा नफा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ३२ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीला जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये २,०२० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी समान तिमाहीमध्ये कंपनीला १,५३२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. एलअँडटीच्या वतीने एका प्रसिद्धिपत्रकात ही माहिती देण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान एलअँडटीचे उत्पन्न ५.४ टक्क्यांनी वाढून २६,८४८ कोटी रुपये राहिले आहे. गेल्या वर्षी समान तिमाहीमध्ये हे २५,४७४ कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च २३,५०७ कोटी रुपयांनी वाढून २६,४४७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
अदानी पाॅवर – अदानी पाॅवर तोट्यातून निघून नफ्यात आली आहे. कंपनीला जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये २९७.७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी या समान तिमाहीमध्ये कंपनीला ३१३.०५ कोटींचा नगदी तोटा झाला होता. कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कंपनीला या समान तिमाहीमध्ये १४ टक्क्यांच्या वाढीसह ६,४६२.४७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. गेल्या वर्षी या समान तिमाहीमध्ये कंपनीला ५,६७०.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते.
रिलायन्स इन्फ्रा – अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात ४.६ टक्के घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीला ५४३.८१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी समान तिमाहीत कंपनीला ५७०.६० कोटी रुपये नफा झाला होता. असे असले तरी अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील या कंपनीच्या उत्पन्नात ३.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या उत्पन्नाचा आकडा ७,४७६.१६ कोटी रुपयांनी वाढवून ७,७३४.९१ कोटी रुपये झाला आहे, तर दुसरीकडे दुसऱ्या तिमाहीतील खर्च ९.३१ टक्क्यांनी वाढून ७,५४९.९५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या समान तिमाहीमध्ये कंपनीचा ६,९०६.८७ कोटी रुपये खर्च झाला होता. रिलायन्स इन्फ्रा विविध उच्च विकास दर असलेल्या क्षेत्राशी म्हणजेच वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र तसेच संरक्षण क्षेत्रात सक्रिय आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र – बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांनी सप्टेंबर २०१७ तिमाहीअखेरचे बँकेच्या आर्थिक परिणामांचे निकाल जाहीर केले. सप्टेंबर तिमाहीत नफ्यात ६२ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून निव्वळ तोट्यामध्ये ९३ टक्क्यांची घट झाली आहे. गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ तोटा रु. ३३७ कोटी होता, तो यावर्षी रु. २३ कोटी झाला आहे. निव्वळ व्याज मार्जिनमध्ये या वर्षीच्या प्रथम तिमाहीच्या १.८७ % तुलनेत भरीव प्रगती होऊन दुसऱ्या तिमाहीत २.६४ % झाली आहे. ‘बेसल-थ्री’ मार्गदर्शक प्रमाणानुसार सप्टेंबरअखेरीस बँकेचा सीआरएआर ११.२८% भांडवल असून जूनअखेरीस हे प्रमाण ११.०८% इतके होते. क्यूआयपीच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उभारण्याच्या प्रक्रियेमध्ये बँक आहे.
Share This Article