एमपीएससी : सामान्य अध्ययन घटकाची तयारी

0
292

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन घटकामध्ये एकूण ६ उपघटक आहेत. या उपघटकांवरील प्रश्नांचा आढावा आणि त्यांबाबत विश्लेषण मागील लेखात पाहिले. त्यांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

सामान्य अध्ययन घटकामध्ये समाविष्ट ५ विषय हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे ‘नव्या दृष्टिकोना’तून करणे आवश्यक आहे. इतिहास वगळता या घटकांवरचे प्रश्न ‘मूलभूत’ संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत नाहीत. विषयाच्या मूलभूत संकल्पना, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पलूंवर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे यांचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे.

Advertisement

‘चालू घडामोडी’ हा उपघटक इतर उपघटकांच्या संबंधाने महत्त्वाचा आहेच. शिवाय या मूलभूत विषयांच्या चालू घडामोडींच्या व्यतिरिक्त काही भागाची तयारीही या घटकात येते. त्यामुळे वेगळा घटक म्हणूनच याची तयारी करायला हवी. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक, संरक्षण, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा, साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती, चच्रेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक अशा मुद्दय़ांवर भर द्यावा.

इतिहासाचा अभ्यास करताना राजकीय व सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. त्यासाठी घटनांमधील परस्पर संबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात व लक्षात राहातात. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. मात्र काही समाज सुधारक व स्वातंत्र्यसैनिक यांचे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचा अतिरिक्त अभ्यास गरजेचा आहे. यासाठी बिपिनचंद्र यांचे ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ व स्पेक्ट्रम प्रकाशनाचे आधुनिक भारताच्या इतिहासावरील पुस्तक ही पुस्तके पुरेशी आहेत.

भूगोलाचा अभ्यास करताना उपघटकांना प्राकृतिक-आर्थिक-सामाजिक अशा क्रमाने महत्त्व देणे आवश्यक आहे. मूलभूत संज्ञा व संकल्पनां आधी समजून घेऊन मग भौगोलिक घटना व प्रक्रियांचा अभ्यास करावा. प्राकृतिक विभाग, नदी-पर्वत प्रणाली यांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करावा. याबाबत भारत-महाराष्ट्र व जग अशा क्रमाने महत्त्व देऊन अभ्यास आवश्यक आहे. मान्सूनची निर्मिती व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आर्थिक भूगोलामध्ये खनिजे व त्यांचे उत्पादन, महत्त्वाचे उपयोग व त्यांची स्थाननिश्चिती, महत्त्वाची पिके व त्यांचे उत्पादक प्रदेश यांचा अभ्यास सारणी पद्धतीमध्ये मांडून करता येईल.

भारतीय राज्यव्यवस्था विषयाच्या तयारीचा पाया आहे. राज्यघटनेचा अभ्यास, घटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्ये, नीतीनिर्देशक तत्त्वे, घटनात्मक पदे, महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या तरतुदी, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी तोंडपाठ असायला हव्यात. केंद्र-राज्य संबंध, न्यायालयीन उतरंड, महत्त्वाच्या संज्ञा समजून घ्यायला हवेत. पंचायती राज व्यवस्था, बारकाईने समजून घ्यायला हवी. चच्रेत असलेले तसेच प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.

अर्थव्यवस्था विषयाच्या अभ्यासाची सुरुवात राष्ट्रीय उत्पन्न, चलन, बँकिंग, शासकीय अर्थव्यवस्था, आयात निर्यात, लेखा व लेखापरीक्षण, महागाई, दारिद्रय़, रोजगार यांच्याशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घेऊन करायला हवी. या मुद्दय़ांबाबतची महत्त्वाची आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी व चालू घडामोडी माहीत असायला हव्यात. पंचवार्षकि योजनांचे उद्दिष्ट, ध्येयवाक्य, महत्त्वाच्या योजना व प्रकल्प आणि त्यांचे प्रतिमान यांचा आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे. तसेच इतर योजनांचे उद्दिष्ट, लाभार्थी व महत्त्वाच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

पर्यावरणीय परिस्थिती घटकामध्ये परिसंस्था, तिचे घटक, अन्न साखळी इत्यादी बाबी उदाहरणासहित समजून घ्यायला हव्या. ‘जैवविविधता’ ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आर्थिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसंस्था पाहायला हव्यात. कवउठच्या रेड लिस्टमधील भारताच्य संकटग्रस्त प्रजाती, वन्यजीवन संवर्धनाचे कायदे, ठराव, अभयारण्ये व संबंधित संकल्पना यांचाही आढावा आवश्यक आहे.

हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, जागतिक तापमानवाढ या संकल्पना व त्यांचा परस्परसंबंध समजून घ्यायला हवा. हवामान बदलाबाबत क्योटो प्रोटोकॉलमधील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी लक्षात घ्याव्यात. याबाबत भारताची भूमिका नेमकेपणाने समजून घ्यायला हवी व भारतातील यासाठीचे प्रयत्न, त्यासाठीचे कायदे, धोरणे, योजना पाहायला हव्यात.

मेहनत किती घेताय यापेक्षा ती कशी घेताय यावरच यश अवलंबून असते. विश्लेषणावर आधारित अभ्यास व अभ्यासक्रमाच्या चौकटीत केलेली तयारी हीच यशाकडे नेणाऱ्या मेहनतीची गुरुकिल्ली आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

– फारुक नाईकवाडे

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here