⁠  ⁠

एमपीएससी : गट ‘क’ सेवांची काठिण्य पातळी

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

पहिली गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सन २०१८मध्ये पार पडली. या वर्षीची पूर्वपरीक्षा २६ जून रोजी आयोजित करण्यात येत आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या विविध विभागांमधील पदांवर भरतीसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात. संबंधित पदांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्या पदांसाठी परीक्षा पद्धती, तिचा अभ्यासक्रम आणि काठिण्य पातळी ठरविण्यात येते. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न व दर्जा यांमध्ये फरक असतो.

गट ब अराजपत्रित अधिकारी व गट क कर्मचारी या सेवांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे आणि परीक्षेचे स्वरूपही.

*    अभ्यासक्रम                    

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

५. अर्थव्यवस्था  –

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

अ) बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

ब) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी

*    पूर्वपरीक्षेचे स्वरूप

*    गुणांकन

या परीक्षेत मूल्यांकन करताना उत्तरपत्रित नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. भरायच्या एकूण पदांच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.

गट ब अराजपत्रित अधिकारी व गट क कर्मचारी या दुय्यम सेवांच्या परीक्षेमध्ये फरक आहे तो काठिण्य पातळीचा. गट ब अराजपत्रित अधिकारी पदांच्या परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेला प्रश्नांचा दर्जा आहे पदवीचा तर गट क पदांसाठी बारावीचा. दर्जातील हा फरक व काठिण्य पातळीचे नेमके स्वरूप समजून घेतले की तयारीसाठी एक दृष्टिकोन ठरवता येतो. गट क सेवेच्या सन २०१७ च्या पहिल्या पेपरचे विश्लेषण केल्यास काठिण्य पातळीबाबत पुढील मुद्दे समजून घेता येतील

Untitled 4 54

* प्रश्नातील मुद्दे हे ढोबळ आणि थेट आहेत.

* प्रश्नांमधील विधाने ही तथ्यात्मक माहिती विचारणारी असली तरी ही तथ्ये त्यामध्ये बारकाईने व नेमकेपणाने माहीत असणे आवश्यक असल्याचे दिसते.

* गट क सेवेसाठीच्या प्रश्नामध्ये बारावीच्या स्तराचे ढोबळ मुद्दे विचारलेले आहेत. हे मुद्दे पारंपरिक अभ्यासक्रमाचा भाग आहेत आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही उमेदवाराला त्या विषयातील अतिरिक्त प्रावीण्य न मिळवताही या बाबी माहीत असणे सर्वसामान्यपणे अपेक्षित असते.

* चालू घडामोडींवरील प्रश्नसारणी पद्धतीत टिप्पणे मांडून तयारी करता येईल अशा प्रकारचे आहेत. म्हणजेच पूर्णपणे वस्तुनिष्ठ व विश्लेषणाची आवश्यकता नसलेले आहेत.

* इतिहासामध्ये तथ्यात्मक मुद्दे आणि व्यक्तींवर आधारित प्रश्न विशेषत्वाने विचारण्यात येतात.

* नागरीकशास्त्र घटकाचे प्रश्न पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रकारचे आहेत. पायाभूत पुस्तकांचा अभ्यास व्यवस्थित केल्यास सहजपणे सोडविता येतात.

* भूगोलामध्ये बहुविधानी प्रश्न जास्त विचारण्यात आले असले तरी ते चूक की बरोबर अशा प्रकारचे असल्याने त्यांचाही समावेश वस्तुनिष्ठ व पारंपरिक प्रकारामध्येच करायला हवा.

* सामान्य विज्ञान व अर्थव्यवस्था या घटक विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे.

* सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रातील प्राथमिक गणितेही विचारण्यात आली आहेत. ही गणिते बारावी स्तरावरील पाठय़पुस्तकांमधील उदाहरणांसारखी आहेत.

* अर्थव्यवस्था घटकामध्ये मूलभूत संकल्पनांवर बहुविधानी प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच या घटकाच्या प्रश्नांवर चालू घडामोडींचा जास्त प्रभाव दिसून येतो. त्यामुळे आर्थिक चालू घडामोडींच्या पारंपरिक मुद्दय़ांची तयारी करणे आवश्यक ठरते.

काठिण्य पातळीबाबत एकदा स्पष्टता आली की तिचा फारसा विचार न करता जास्तीत जास्त बारकाईने पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे जास्त व्यवहार्य आहे. यातून संकल्पना स्पष्ट होण्यास, नेमका अभ्यास होण्यास आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण होण्यास खूप मदत होते.

पुढील लेखापासून तयारीबाबत विश्लेषणाच्या आधारे घटकनिहाय चर्चा करण्यात येईल.

-फारूक नाईकवाडे

Share This Article