⁠  ⁠

Current Affairs 14 -15 January 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

1) भारतात ९४०० शत्रुसंपत्ती

स्वातंत्र्याच्या वेळी ज्या लोकांनी पाकिस्तान व चीनमध्ये जाऊन नागरिकत्व स्वीकारले आहे, अशा लोकांच्या भारतातील मालमत्तांमध्ये या शत्रुसंपत्तीची गणना केली जाते. या संबंधातील कायदा ४९ वर्षे जुना असून त्यात सुधारणा केल्यानंतर हे निश्चित केले गेले की, फाळणीच्या वेळी व त्यानंतर पाकिस्तान व चीनमध्ये जाऊन तेथील नागरिकत्व घेतलेल्या लोकांच्या भारतातील मालमत्तेवर कोणताही दावा राहाणार नाही. या संबंधात गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना अलीकडेच झालेल्या एका बैठकीत सांगण्यात आले होते की, ६२८९ इतक्या शत्रुसंपत्तीची पाहणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २९९१ इतक्या शत्रुमालमत्ता या संरक्षकासोबत असून त्यांचीही पाहणी लवकरच पूर्ण केली जाईल. त्या वेळी सिंह यांनी आदेश दिले होते की, ज्या शत्रुसंपत्तीबाबत कायदेशीर अडचणी नाहीत, अशा मालमत्तांबाबत लवकरच निपटारा केला जावा. यामधील ९४०० मालमत्तांची किंमत एक लाख कोटी रुपये असून जेव्हा त्यांची विक्री केली जाईल, तेव्हा सरकारला मोठी रक्कम त्यामधून मिळणार आहे. पाकिस्तानातही भारतीयांच्या तेथे असलेल्या अशा मालमत्तांची विक्री केली गेली आहे. राज्य सरकारद्वारे अशा मालमत्तांची ओळख स्पष्ट करणे, त्यांच्या किमतीचे आकलन करून घेणे आदी कामांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांकडून एकंदर ९२८० इतक्या मालमत्ता भारतातच सोडून देण्यात आल्या. यामध्ये सर्वात जास्त मालमत्ता या उत्तर प्रदेशात असून त्यांची संख्या ४९९१ इतकी आहे. तसेच प. बंगालमध्ये ही संख्या २७३५ इतकी असून राजधानी दिल्लीमध्ये ही संख्या ४८७ आहे.

2) शाळेच्या सुरक्षा पडताळणीसाठी १६४ मानकांची चेकलिस्ट

मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने(एनसीपीसीआर) बालके व शाळेच्या सुरक्षेशी निगडित बाबी एकत्रित करीत एक सुरक्षा मॅन्युअल तयार केले आहे. यात १६४ बिंदूंची चेकलिस्ट देण्यात आली आहे. या चेकलिस्टच्या आधारे पालक शाळेतील सुरक्षा व्यवस्थेची माहिती करून घेऊ शकतील. या चेकलिस्टच्या आधारे पालक शाळेत सुरक्षा ऑडिट करू शकतील. त्यांना यात कसलीही कमतरता दिसून आली तर शिक्षण विभागाकडे याची तक्रार करण्यात आली पाहिजे, असे एनसीपीसीआरचे सदस्य प्रियंक कानुनगो यांनी सांगितले. बालकांच्या सुरक्षेशी निगडित या दिशानिर्देशांचे पालन करणे शाळांसाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. एनसीपीसीआरच्या संकेतस्थळावर ही चेकलिस्ट उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास वर्षभरात तयार करण्यात आलेल्या या चेकलिस्टमध्ये १६४ बिंदूंवरील सुरक्षा उपाय सुचविण्यात आले आहेत. शाळेच्या इमारतीचे बांधकाम नियमानुसार असावे, गरजेचे सुरक्षा प्रमाणपत्र असावे, इमारत व आवारात विषारी पदार्थ असू नयेत, दिव्यांग बालकांसाठी अनुकूल वर्गखोल्या, शौचालय, खानावळ, प्रवेशद्वार, ग्रंथालय व मैदान असावे असे यात म्हटले आहे. स्कूलबसचा चालक प्रशिक्षित असावा व त्याच्याकडे परवाना असावा. बस कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन असावे. ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट ड्युटीसाठी योग्य वेळापत्रक असावे. पॉक्सोत आरोपी नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्व कर्मचाऱ्यांकडून घेतले पाहिजे, आदींचा चेकलिस्टमध्ये समावेश आहे.

3) पंतप्रधान मोदींनी 4 वर्षांत 8 वेळा केले शिष्टाचार मोडून राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

पंतप्रधान मोदींनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे शिष्टाचार मोडून स्वागत केले. त्यांनी ८ वेळा राष्ट्राध्यक्षांचे असे स्वागत केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी तीनदा शिष्टाचार मोडून राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले.

* मोदींनी सर्वात आधी जिनपिंग यांचे केले स्वागत

सप्टेंबर २०१४ : मोदींनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शिष्टाचार मोडून स्वागत केले.
जानेवारी २०१५ : राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे स्वागत केले.
डिसेंबर २०१५ :जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबेंचे बनारसमध्ये स्वागत केले.
जानेवारी २०१६ :फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांचे चंदिगडमध्ये स्वागत केले.
जानेवारी २०१७ : अबुधाबीचे प्रिन्स शेख मोहंमद बिन जायद अल नहयान यांचे स्वागत केले.
एप्रिल २०१७ : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे दिल्लीत स्वागत केले.
जुलै २०१७ :जपानी पीएम अॅबेंसोबत अहमदाबादेत रोड शो.
जानेवारी २०१८ : १५ वर्षांनंतर भारतात आलेल्या इस्रायली पंतप्रधानांचे स्वागत.

* माेदींच्या स्वागतासाठी यांचाही शिष्टाचार बाजूला

– मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना नीतोंनी गाडी चालवत मोदींना रेस्तराँमध्ये नेले.
– २०१५ मध्ये यूएएई दौऱ्यात प्रिन्स शेख मो.बिन जायद अल नाहयान यांनी स्वागत केले हेाते.
– २०१७ मध्ये ढाक्यात शेख हसीना यांच्याकडून स्वागत.
– चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिष्टाचार मोडून मोदींना गृहनगर शियानमध्ये नेले.

4) UN मध्ये भारताचे राजदूत अकबरुद्दीन यांचे ट्विटर हॅक

भारताचे संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. सय्यद यांच्या अकाउंटवरून पाकिस्तानचा ध्वज व पाकिस्तानचे पंतप्रधान ममनून हुसेन यांची छायाचित्रे शेअर करण्यात आली. त्याशिवाय सय्यद यांच्या अकाउंटमधून पडताळणी करणारी ब्ल्यू रंगातील खूणदेखील गायब झाली. परंतु काही वेळातच अकाउंट पूर्ववत झाले. मी पुन्हा परत आलो आहे, असे अकबरुद्दीन यांनी ट्विट करून सांगितले. मला शांत करण्यासाठी हॅक करणे पुरेेसे नाही. ट्विटर इंडिया व मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या हॅकर्सनी भारताच्या संस्थांवर नेहमीच हल्ले केले आहेत. अशाच प्रकारचे आरोप पाकिस्ताननेही वारंवार केले आहेत. दरम्यान, भारताच्या गृह मंत्रालयाने संसदेत हॅकिंगच्या घटनांची माहिती दिली होती. त्यानुसार २०१६ मध्ये एकूण १९९ सरकारी संकेतस्थळे हॅक झाली होती. २०१३ पासून २०१६ दरम्यान ७०० हून अधिक सरकारी संकेतस्थळे हॅक झाली होती. पाककडून सातत्याने सायबर चोरी, हॅकिंग केली जाते.

5) मराठमोळी शिल्पा शिंदे बनली ‘बिगबॉस 11’ ची विनर

बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. शिल्पाने टीव्हीची लाडकी ‘बहू’ हिना खान हिला मात देत ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले शिल्पाला हिनाच्या तुलनेत प्रचंड वोट मिळाले. वास्तविक शोच्या सुरुवातीपासूनच शिल्पा शिंदे शोमध्ये विजेत्या ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार समजली जात होती. परंतु मधल्या काळात हिना खान आणि विकास गुप्ता तिच्यावर भारी पडताना दिसत होते. मात्र अखेर बिग बॉसने करोडो प्रेक्षकांची फेव्हरेट शिल्पा शिंदेलाच या शोची विजेता निश्चित केल्याची चर्चा आहे.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Share This Article