एमपीएससी : सी सॅट उताऱ्यांचे आकलन

1
97
mpsc-exam
 • उमेदवारांच्या आकलनाची परीक्षा घेण्यासाठी हा घटक पूर्व परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. दिलेला उतारा उमेदवारांनी समजून घेऊन त्यावरील प्रश्नांची कमीत कमी वेळेत उत्तरे देणे यामध्ये अपेक्षित आहे. पूर्व परीक्षेत सन २०१३ पासून तर मुख्य परीक्षेत सन २०१७ पासून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेमध्ये हा भाग समाविष्ट झाला आहे. पारंपरिक आकलनाच्या पद्धतीमध्ये आपल्या भाषेत प्रश्नांची उत्तरे लिहून आपले कौशल्य दाखविण्यास वाव असतो. पण वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये दिलेल्या पर्यायांमधून उत्तरे शोधताना नेमकेपणा आणि प्रश्नकर्त्यांला अपेक्षित उत्तराचा अंदाज बांधणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. उमेदवारांच्या मागील वर्षांच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर या विषयाच्या तयारीमध्ये पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
 • उताऱ्याच्या पहिल्या काही ओळी वाचून तो अवघड वाटल्याने आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्यावरील प्रश्न फारसे आव्हानात्मक नसले तरी अवघड वाटू लागतात. परीक्षा हॉलमध्ये आपल्याला उताऱ्याचा अभ्यास करायचा नाही तर प्रश्नांची उत्तरे देऊन गुण मिळवायचे आहेत हे मनामध्ये व्यवस्थित िबबवून घ्यायला हवे. आपल्याला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित सापडत असेल तर उतारा संपूर्णपणे कळला नाही तरी हरकत नसते. अर्थात केवळ प्रश्न वाचून त्यांची उत्तरे शोधली आणि काम झाले असा कोणताही उतारा सहज सोपा नसतो. तो ढोबळ मानाने तरी समजलाच पाहिजे. एखादा उतारा नाही समजला आणि त्यावर तथ्यात्मक माहिती विचारली असेल तर तो बोनस घ्यायलाच हवा.
 • बऱ्याच वेळा उताऱ्यातील त्या त्या विषयाशी संबंधित अवघड पारिभाषिक शब्दांमुळे किंवा उताऱ्याचा टोन औपरोधिक किंवा तिरकस असल्यामुळे उमेदवारांना उताऱ्याचे आकलनच होण्यात अडचणी येतात.
 • पुरेसा सराव नसेल तर कमी वेळेत उतारा समजून घ्यायच्या गडबडीत तणाव येतो. त्यामध्ये एकाग्रतेने आणि वेगाने उतारा वाचणे आव्हानात्मक वाटते आणि वेळेचे नियोजन आणि मार्काचे गणित दोन्ही कोलमडते.
 • बहुतांश वेळा मराठीतूनच उतारा वाचण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण यामुळे पर्यावरणविषयक किंवा काही विज्ञानविषयक माहितीवरील उतारे वाचून समजण्यास जास्त वेळ लागतो. अशा उताऱ्यांमध्ये जर पारिभाषिक संज्ञा जास्त असतील आणि तथ्यात्मक प्रश्न जास्त विचारले असतील तर असे उतारे इंग्रजीतून वाचल्यास वेळेची बचत होऊ शकते.
 • प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून दिसते की, प्रबोधन, लेखकांचे व्यक्तिगत अनुभव, अ‍ॅबस्ट्रक्ट विषयांवर आधारित उताऱ्यांवर बरेचदा संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे अशा विषयांचे उतारे लोकसत्ता, साधना मासिक अशा स्रोतांतून वाचणे आणि तयारीच्या वेळी ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उतारे समजून घ्यायचा सराव झाला की परीक्षा हॉलमध्ये कमीत कमी वेळेमध्ये त्यांचे आवश्यक आकलन होण्यास मदत होते.
 • तथ्यात्मक माहिती, पारिभाषिक संज्ञांचा समावेश असलेल्या उताऱ्यांवर सरळ प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे हे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते. आधी प्रश्न पाहून असे उतारे वाचत गेल्यास शक्य तेथे प्रश्नानुसार आवश्यक माहिती अधोरेखित करत उतारा वाचन करणे शक्य होते. यामुळे उत्तरे देण्याचा वेळही कमी होतो.
 • मराठी आकलनासाठी तिरकस, औपरोधिक आणि तत्त्वचिंतनपर अशा विषयांवरील साहित्य वाचण्याचा सराव आवश्यक आहे.
 • इंग्रजी आकलनासाठी द इंडियन एक्स्प्रेसमधील संपादकीय, विज्ञान व अर्थव्यवस्थेबाबतचे लेख वाचून ते समजून घेण्याचा सराव आवश्यक आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रह वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला हवा. याचा फायदा कायमच होणार आहे.
 • दिलेला उतारा उमेदवार पहिल्यांदाच वाचत आहे हे प्रश्नकर्त्यांला माहीत असते त्यामुळे विनाकारण गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जात नाहीत.
 • वाचनाचा वेग आणि आकलन वाढविण्याचा प्रयत्न करणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहेच. शिवाय बाकीच्या एकूण अभ्यासामध्येही अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसते वाचन आणि आकलनासहीत वाचन यांमध्ये गुणवत्ता आणि आवश्यक वेळ दोन्हीतही फरक असतो. त्यासाठी सुरूवातीपासूनच क्वालिटी रीिडग- गुणवत्तापूर्ण वाचनाची सवय लावून घ्यायला हवी.
 • उताऱ्यावरील प्रश्न हा पूर्व परीक्षेमध्ये सर्वाधिक लांबीचा प्रश्न घटक आहे. साधारणपणे १० ते ११ उताऱ्यांवर एकूण ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतात. सर्वाधिक गुणांसाठी असणारा हा भाग सर्वाधिक वेळखाऊसुद्धा असतो. त्यामुळे याची तयारी आणि परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन या बाबी अत्यंत काळजीपूर्वक आखणे आवश्यक आहे.

-रोहिणी शहा
सदर लेख हा दैनिक लोकसत्तामधील आहे

Advertisement

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here