⁠  ⁠

अपंगत्वावर मात करीत राज्यात पहिला

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

दुर्दम्य इच्छाशक्ती व ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा असली, की यशश्री निश्‍चितच आपल्या गळ्यात माळ घालते, याची प्रचिती येथील शेतकरी कुटुंबातील दिव्यांग सचिन शिवाजी शिंदे याने दिली आहे. अपंगत्वावर मात करून सचिनने पुरवठा निरीक्षकपदाच्या परीक्षेत अपंग संवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याची अन्नपुरवठा निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.


कुसुंबा (जि. धुळे)  येथील सचिन हा दोन्ही पायांनी अपंग आहे. कुटुंबातील कुणीही जास्त शिक्षण घेतलेले नसताना सचिनने आपल्या सात बाय दहाच्या पडक्‍या खोलीत जिद्दीने नियमितपणे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करून हे निर्भेळ यश मिळविले आहे. त्याने परिस्थितीचा अभ्यासात कधीही अडसर येऊ दिला नाही. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील सचिनचे वडील शिवाजी शिंदे स्वतःच्या शेतीसह शेतमजुरीही करतात. सचिनची नुकतीच मालेगाव (जि. नाशिक) येथे अन्न व पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, त्याने पदभारही स्वीकारला.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून त्यादृष्टीने अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्‍चितच यश प्राप्त होते. संकटांना, अपयशाला घाबरून न जाता निरंतर अभ्यास सुरू ठेवा. अभ्यासानंतर मनन, चिंतन करा. जेणेकरून आपले लक्ष दुसरीकडे विचलित होणार नाही. नियमित अभ्यास केल्याने यश निश्‍चितच आपल्या पायाशी लोळण घालते, हा विश्वास कायम मनात असू द्या. 
सचिन शिंदे, अन्न व पुरवठा निरीक्षक, मालेगाव 

Share This Article