⁠  ⁠

चालू घडामोडी – ७ जुलै २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

एलएचसी प्रयोगातील माहितीच्या आधारे तीन नवीन कणांचा शोध
# लार्ज हैड्रोन कोलायडर यंत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी तीन नवीन असाधारण कणांचे निरीक्षण केले असून एक्स ४१४० या पूर्वी सैद्धांतिक पातळीवर शोधलेल्या चौथ्या कणाचे अस्तित्व निश्चित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एलएचसी म्हणजे लार्ज हैड्रोन कोलायजर हा जगातील सर्वात मोठा कण आघातक (पार्टिकल कोलायडर) असून त्यात हिग्ज बोसॉन या कणाचा शोध लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आता शोधण्यात आलेले नवे कण हे चार क्वार्कचे बनलेले असून क्वार्कस हे कुठल्याही द्रव्यातील अणूंच्या आतील भागातले मूलभूत घटक असतात. त्यात दोन क्वार्क व दोन अँटीक्वार्क यांचा समावेश असतो. अप्रमाणित स्वरूपाच्या क्वार्कमुळे नवीन कण हे विचित्र किंवा असाधारण कण या नव्या वर्गवारीत समाविष्ट करण्यात आले असून त्यांचा अर्थ लावण्याचे काम चालू आहे.

चीनकडून सर्वात मोठे सैनिकी, वाहतूक विमान दाखल
# चीनने बुधवारी देशांतर्गत निर्मिती केलेले सर्वात मोठे ‘वाय-२०’ हे सैन्याची आणि मालाची दीर्घ पल्ल्यापर्यंत कोणत्याही मोसमात वाहतूक करणारे विमान लष्कराच्या ताफ्यात दाखल केले. लष्करी हवाई तंत्रज्ञानातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वाय-२०ला सेवेमध्ये दाखल करणे हे हवाई दलासाठी अंत्यत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यांमध्ये मोलाची भर पडणार आहे, असे हवाई दलाचे प्रवक्ता शेन जिंके यांनी सांगितले. जवळपास २०० टन वजनाचे साहित्य नेण्याची या विमानाची क्षमता आहे. हे विमान कोणत्याही हंगामामध्ये सामान आणि सैनिकांना अतिशय दूर अंतरावर नेऊ शकते. सध्या हे विमान चेंगडू येथील पीएलए हवाई दलात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र

पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, रणजित पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद?
# राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होणार असून, यामध्ये भाजपकडून पांडुरंग फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असून, सध्या राज्यमंत्रीपदी कार्यरत असलेल्या राम शिंदे आणि रणजीत पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये ८ ते ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे, याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, त्यामधील काही नावे निश्चित समजली जात आहेत.

अर्थव्यवस्था

सेवा क्षेत्रातील वाढ खुंटली
# देशातील सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरली. नव्या व्यवसाय मागणीला प्रतिसाद नसल्याने हे क्षेत्र जूनमध्ये ५०.३ अंशांवर म्हणजे सात महिन्यांच्या खोलात शिरले आहे. मार्च २०१६ मध्ये ५४.३ पर्यंत विस्तारल्यानंतर एप्रिल २०१६ पासून ते सातत्याने घसरले आहे. वर्षभरापूर्वी, जून २०१५ मध्येही ते ५०च्या खाली, ४७.७ पर्यंत होते. जुलै २०१५ पासून ते ५० टक्क्यांच्या वर राहिले आहे. मंगळवारी जाहीर झालेला जूनमधील ५०.३ हा निक्केई सेवा व्यवसाय कृती निर्देशांकाचा (मार्किट) वर्षभरातील दुसरा नीचांक स्तर आहे. त्याचे ५० टक्क्यांवरील परिमाण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. सेवा क्षेत्राची आकडेवारी जाहीर करताना ‘मार्किट’चे अर्थतज्ज्ञ पॉलिआना डि लिमा म्हणाल्या की, निर्मिती क्षेत्र तुलनेने वाढले असले तरी व्यवसाय मागणी, रोजगाराबाबत चित्र चांगले नाही.

रोपांच्या संवर्धनासाठी दशकभरात ९६ कंपन्या स्थापन
# बियाणे कायदा १९६६ अंतर्गत ऊती संवर्धनाने वाढवलेल्या रोपांसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रमाणपत्र प्रणाली (एनसीएस -टीसीपी) अंतर्गत गेल्या दशकभरात ९६ कंपन्या, ५ चाचणी प्रयोगशाळा आणि दोन संदर्भ केंद्रे मान्यताप्राप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत ८० दशलक्ष ऊती संवर्धन केलेले रोपे या यंत्रणेतून प्रमाणित करण्यात आली आहेत. जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, रोपांचे ऊती संवर्धनातून प्रमाणित करणारी संस्था यांनी ‘ऊती संवर्धन वापर करून वाढवलेल्या रोपांसाठी प्रमाणपत्र प्रणाली (एनसीएस-टीसीपी) या विषयावर बायोटेक काँसोर्टीअम इंडिया लिमिटेड (बीसीआयएल) मार्फत भागधारकांची सभा नुकतीच दिल्ली येथे झाली.

स्टेट बँक विलीनीकरणाला गती
# सहयोगी पाच बँका व भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. विलिनीकरणासाठीचे मूल्य निश्चित करण्यासाठी एसबीआय कॅपिटलने प्रस्ताव मागविले आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला लेखा परिक्षकांची परवानगी घेण्यात आल्याची माहिती स्टेट बँक समूहातील एसबीआय कॅपिटलने बुधवारी दिली. याबाबतच्या सध्याच्या नोटिशीत एसबीआय कॅपिटलने स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर व स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर या तीन सहयोगी बँकांचा उल्लेख आहे. म्हणजेच या तीन सहयोगी बँकेचे मुख्य स्टेट बँकेत विलीनीकरणासाठी समभाग मूल्य, व्यवहार निश्चिती केली जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात मुख्य बँकेच्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद व स्टेट बँक ऑफ पटियाळा यांचा क्रम लागण्याची शक्यता आहे. समभागांची रचना, त्यांचे मूल्य याबाबतचा प्रस्ताव मागविण्याकरिता ही नोटीस जारी करण्यात आली आहे. प्रत्येक बँकेकरिता स्वतंत्र किंमत सुचविण्यासह सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

काळ्या धनासंदर्भातील कराची मुदत वाढणार
# नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जाहीर केलेली अघोषित संपत्ती आणि काळा पैशावरील कर भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, हा कर हप्त्याने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. “नोव्हेंबर महिन्यात बाजारातील तरलतेचा अभाव लक्षात घेऊन केंद्र सरकार अघोषित संपत्तीवरील कर भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी नेमका किती कालावधी देता येईल याविषयी चर्चा सुरु आहे. आम्ही कर आणि दंडाची रक्कम हप्त्याने भरण्याची मंजुरी दिली आहे”, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

TAGGED:
Share This Article