⁠  ⁠

Current Affairs 7 February 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 4 Min Read
4 Min Read

1) अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने ‘अग्नी-१’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे ओडिशाच्या तटाजवळून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास यशस्वी प्रक्षेपण केले. अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र ७ हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. प्रक्षेपणादरम्यानचे क्षेपणास्त्राने सर्व निर्धारित उद्देश यशस्वीरीत्या पूर्ण केले.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यात सक्षम असलेल्या अग्नी-१ क्षेपणास्त्राची निर्मिती देशातच करण्यात आली आहे. लष्कराची संचालनात्मक तयारी मजबूत करण्यासाठी वेळोवेळी केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाअंतर्गत ही चाचणी घेण्यात आली. डॉ. अब्दुल कलाम बेटावरील एकीकृत परीक्षण रेंज अर्थात आयटीआर पॅड ४ च्या मोबाईल लाँचरने क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. १२ टन वजनी आणि १५ मीटर लांबीच्या अग्नी-१ क्षेपणास्त्रामध्ये एक हजार किलोग्रॅमपर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. क्षेपणास्त्राला प्रगत सिस्टम्स प्रयोगशाळा अर्थात एएसएलने संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र इमारतीच्या (आरसीआय) सहकार्याने विकसित केले आहे. एएसएल क्षेपणास्त्र विकसित करणारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा आहे.

2) राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणास मंजुरी

राज्‍याच्या वस्‍त्रोद्योग धोरणाला राज्‍य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्‍यातील वस्‍त्रोद्योगाला यामुळे नवी दिशा मिळणार असून ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १० लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. या धोरणामुळे कापूस उद्योगाचे बळकटीकरण, रेशीम उद्योगाचे पुनरुज्जीवन व अपारंपरिक तंतू निर्मिती क्षेत्रावर भर देण्यात येईल. कापूस, रेशीम, लोकर व अपारंपरिक सूत (केळी, बांबू, घायपात, नारळ काथा इ.) या सर्व उद्योगातून १० लक्ष नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. २०२० पर्यंत पारंपरिक व अपारंपरिक सूत निर्मिती स्रोतापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल. कापूस उत्पादक क्षेत्रात विशेषत: शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सूत गिरणी उद्योगास प्रोत्साहन देण्यात येईल. वस्‍त्रोद्योगातील प्रोसेसिंग, कंपोझिट युनिट, सूतगिरणी, जिनिंग प्रेसिंग,अनुसूचित जाती-जमाती, अल्‍पसंख्यांक समाजाचे प्रकल्‍प आदींना ५ टक्‍के ते ४५ टक्‍क्‍यांपर्यंत भांडवली अनुदानही देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील प्रोसेसिंग, टेक्निकल टेक्सटाईल, निटींग, होजीअरी व गार्मेंटिंग, प्रकल्पांना २० टक्के व इतर प्रक्रिया उद्योगांना १० टक्के अतिरिक्त अनुदान देण्यात येईल.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

3) खासगी कंपनीने बनवलेले रॉकेट फाल्कन हेवीचे यशस्वी प्रक्षेपण

जगातील शक्तिशाली रॉकेट ‘फाल्कन हेवी’ चे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी कंपनीने फाल्कन हेवी रॉकेटची निर्मिती केली आहे. फ्लोरिडातील केनडी स्पेस सेंटर तळावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावले. फाल्कन हेवीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. याच फ्लोरिडातील तळावरुन नासाच्या चंद्र मोहिमेला सुरुवात झाली होती. या 23 मजली जंबो रॉकेटमध्ये पेलोड म्हणून टेस्लाची लाल रंगाची कार ठेवण्यात आली होती. फाल्कन रॉकेटचे वजन 63.8 टन आहे. दोन अवकाश यानांइतके हे वजन आहे. 230 फूट लांबीच्या या यानात 27 मर्लिन इंजिन बसवण्यात आले आहे.

4) 14 वर्षीय ‘जलपरी’चा विक्रम

राजस्थानच्या एका 14 वर्षीय मुलीनं सलग 47 तास पोहत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राजस्थानमधील उदयपूरस्थित 14 वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे 47 किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे 3.30 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी 1: 32 वाजता पोहोचली. हे 47 किलोमीटरचे अंतर नऊ तास आणि 23 मिनीटांमध्ये यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला. जुहू ते गेटवे हे अंतर आजवर कोणत्याही जलतरणपटूने पोहून पार केलेले नाही.

5) अनुपम खेर, राम माधव, स्वप्न दासगुप्ता यांचे ट्विटर खाते हॅक

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, भाजपचे महासचिव राम माधव आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार स्वप्न दासगुप्ता यांचे ट्विटर खाते मंगळवारी हॅक करण्यात आले. तुर्कीच्या कथित हॅकर्सनी या प्रसिद्ध व्यक्तींचे खाते हॅक केल्यानंतर त्यावर ‘आय लव्ह पाकिस्तान’ असा मजकूर टाकल्याने ट्विटरकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article