⁠  ⁠

Current Affairs 31 March 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 5 Min Read
5 Min Read

1) उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्कार

राज्य शासनाच्या सेवेतील जे अधिकारी उत्कृष्ट काम करतील, त्यांना मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानुसार दर वर्षी १२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. मंत्रालय, विभाग व जिल्हा स्तरावर वेगवेगळे पुरस्कार दिले जाणार आहेत. उद्दिष्टनिष्ठ व वैयक्तिकनिष्ठ अशा दोन निकषांवर कर्मचारी-अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

कार्यालयातील उपस्थिती, कामाचा निपटारा, वक्तशीरपणा, सचोटी, गोपनीय अहवालातील प्रतवारी, कार्यालयातील वर्तणूक, संवाद कौशल्य, मसुदा कौशल्य, शासन नियमांसंदर्भात ज्ञानाची पातळी, निपक्षपातीपणा, निर्णय क्षमता, लोकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, याचा विचार करुन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. या वर्षी १५ ऑगस्ट रोजी खास समारंभ आयोजित करुन मंत्रालय स्तरावर पुरस्कार दिले जाणार आहेत. पुढील वर्षांपासून सर्व स्तरावर पुरस्कार दिले जातील. २१ एप्रिल हा दर वर्षी नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.

2) केरळमधल्या 1.23 लाख मुलांचा जाती आणि धर्म सांगण्यास नकार दिला

जातीय व्यवस्थेवर समाजात अनेकदा चर्चा केली जाते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांकडून मोर्चेही काढले जातात. परंतु केरळमधल्या जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्षतेचं अनोख उदाहरण समोर ठेवलं आहे. एका शैक्षणिक सत्रात जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जाती आणि धर्माचा उल्लेख करण्याचं टाळलं आहे. केरळमधल्या सरकारी आणि निमसरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्षं 2017-18साठी सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या शैक्षणिक सत्रात जवळपास 1.23 लाख मुलांनी जाती आणि धर्म सांगण्यास नकार दिला आहे. पहिल्या इयत्तेपासून दहावीच्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सत्रात सहभाग घेतला होता. राज्याचे शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ यांनी केरळ विधानसभेत याची माहिती दिली.

3) रशियातून 150 राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी

रशियाने अमेरिका व युरोपीय देशांच्या 150 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली असून, सेंटपीटर्सबर्गमधील अमेरिकेचा दूतावासही बंद करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील रशियाचा माजी गुप्तहेर स्क्रिपल व अजून दोघांवर नर्व्ह एजंटचा जीवघेणा प्रयोग करण्यात आला. यामागे रशियाचा हात असल्याचा आरोप करून ब्रिटन व काही युरोपीय देश तसेच अमेरिकेने रशियाच्या 150 राजनैतिक अधिका-यांची नुकतीच हकालपट्टी केली होती.

अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वी 60 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली होती. तसेच अमेरिकेनं रशियाचं सिएटल येथील दूतावास बंद करण्याचे आदेशही दिले होते. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. ब्रिटनच्या गुप्तहेराला विष देण्याच्या प्रकरणात रशियाचाही हात असल्याचा युरोपियन महासंघाचा आरोप होता. त्यामुळेच अमेरिकेनं 60 राजनैतिक अधिका-यांना निलंबित करत रशियाचं सिएटल येथील दूतावासही बंद करण्याचे आदेश दिले होते.

4) शरीरातील एका नव्या अवयवाचा शोध

शास्त्रज्ञांना शरीरातील आतापर्यंत अज्ञात असलेल्या एका नव्या अवयवाचा शोध लागला आहे. शरीरातील सर्वात मोठा हा अवयव कर्करोगावरील उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतो. शास्त्रज्ञांनी या नव्या अवयवाचे नामकरण ‘इंटरस्टीटियम’ असे केले आहे.

5) जि.प.शाळेच्या विद्यार्थ्याची गिनीज बुकमध्ये नोंद

डहाणू तालुक्यातील जि.प. शाळा गोवणे शाळेतील सहावीचा विद्यार्थी दीपेश रामचंद्र करमोडा (११) मु. पो. साखरे य‍ा आदिवासी विद्यार्थ्याने फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स या प्रकारात आपल्या वर्ग शिक्षक यांचा २८.४५ हा विक्रम मोडून २६.३० सेकंदचा नवा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्याच्या या यशामुळे जि.प. शाळेत शिकणारा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा देशातील प्रथम विद्यार्थी होण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे.विजयचे वर्ग शिक्षक विजय पावबाके यांनी याच प्रकारात नोव्हेंबरमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.

6) मेट्रो स्थानके होणार थीम स्थानके

मुंबई शहराची मुख्य ओळख असणाऱ्या विविध भागांचा समावेश मेट्रो स्थानकांमध्ये थीम स्थानक म्हणून करण्यात येणार आहे. या थीम स्थानकांअंतर्गत मेट्रो स्थानक आतून व बाहेरूनही सुशोभित करण्यात येणार आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ओळख बोरिवली मेट्रो स्थानकांमध्ये हिरवाई जपून करण्यात येणार आहे. तसेच लोखंडवाला येथे बॉलीवूड, विमानतळ परिसरात विमानतळ संबंधित थीम ठेवण्याचे एमएमआरडीएकडून विचाराधीन आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून भविष्यात हाती घेण्यात आलेल्या मेट्रो स्थानकांमध्ये दहिसर, अंधेरीसारख्या गजबजलेल्या स्थानकांचा समावेश आहे. तसेच तेथे स्थापत्य शैलीतील अत्याधुनिक बाबींचा समावेशही करण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ख्रिस्ती विभागातील चर्चसारख्या ऐतिहासिक वास्तू तसेच सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न मेट्रो थीम स्थानकांमधून करण्यात येणार आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article