⁠  ⁠

Current Affairs – 3 April 2017

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

देश-विदेश

# भारतात मानवाधिकार उल्लंघनाचे प्रमाण चिंताजनक
भारतातील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याचे निरीक्षण नोंदवत ही बाब चिंताजनक असल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. यात अलीकडेच मध्य प्रदेशात झालेले आठ सिमी दहशतवाद्यांचे हत्याकांड व परकीय निधीवर पोसल्या जाणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) बंदी आदी घटनांचा उल्लेख आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने तयार केलेल्या ‘भारतातील मानवाधिकाराच्या घटना, २०१६’ या अहवालात देशातील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर बोट ठेवण्यात आले आहे. मोदी सरकारने अलीकडेच परकीय निधीवर चालणाऱ्या २५ स्वयंसेवी संस्थांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावरून केंद्रावर टीकेची झोड उठली. बंदी घालण्यात आलेल्या संस्थांमध्ये अमेरिकास्थित कम्पॅशन इंटरनॅशनल या संस्थेचाही समावेश आहे. गुजरात दंगलीतील बळींच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्यावर मदतनिधीचा गैरवापर केल्याचा आळ घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या प्रकाराची दखलही या अहवालात घेण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे स्वयंसेवी संस्थांकडे पाहण्याचा सरकारी दृष्टिकोन कसा दूषित आहे, याचेच उदाहरण असल्याचे अहवाल म्हणतो. मध्य प्रदेशातील मध्यवर्ती कारागृहातून पोबारा करणाऱ्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार करण्याच्या घटनेची दखल घेत हे हत्याकांड राजकीयदृष्टय़ा प्रेरित होते, असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.

# बॉब डिलन यांनी साहित्याचे नोबेल अखेर स्वीकारले
बऱ्याच अनिश्चिततेनंतर अखेर बॉब डिलन यांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक स्वीकारले असल्याचे स्वीडिश अकादमीने म्हटले आहे.स्टॉकहोम येथे एका खासगी समारंभात अकादमीच्या बारा सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना सुवर्णपदक व मानपत्र देण्यात आले, असे अकादमीच्या स्थायी सचिव सारा डॅनियस यांनी सांगितले. या वेळी आनंद साजरा करून शँपेन उडवण्यात आली. डिलन बराच वेळ सुवर्णपदक न्याहाळत होते. त्यांच्या मानपत्रात लॅटिन भाषेतील महाकवी एनेड यांच्या ओळी उद्धृत केल्या होत्या. त्यात म्हटले आहे, की पृथ्वीवरील जीवन आपल्या कलेने समृद्ध करणाऱ्यास हा पुरस्कार अर्पण करण्यात येत आहे.

# सौरवातामुळे मंगळावरचे वातावरण नष्ट
सौरवात व प्रारणांमुळे मंगळावरचे वातावरण नष्ट झाले. परिणामी, अब्जावधी वर्षांपूर्वी सजीवसृष्टीस अनुकूल असलेला ग्रह वाळवंटासारखा बनला, असे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नासाच्या मार्स अ‍ॅटमॉस्फिअर अँड व्होलॅटाइल मिशनचे प्रमुख संशोधक ब्रुसक जॅकोस्की यांनी सांगितले, की मंगळावर जो वायू होता तो अवकाशात नष्ट झाला. आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत असलेला अरगॉन वायूही अवकाशात गेला. २०१५ मध्ये मावेन यानाच्या सदस्यांनी संशोधनाचे निष्कर्ष मांडताना सांगितले, की मंगळावर एकेकाळी वातावरण होते, पण तो वायू अवकाशात फेकला गेला. मावेन यानावरील उपकरणांनी मंगळावरील आजच्या वातावरणाची मापने घेतली आहेत. द्रव पाणी हे जीवसृष्टीसाठी आवश्यक असते, पण आज वातावरण फारच थंड असल्याने सूक्ष्मजीवांना ते अनुकूल नाही. कोरडी नदीपात्रे व खनिजे अजूनही तेथे आहेत. हे सगळे तेथे एकेकाळी पाणी असल्यामुळे शक्य झाले आहे. पूर्वी मंगळावरचे वातावरण वेगळे होते ते पृष्ठभागावर पाणी वाहण्यास अनुकूल होते. सौरवात व प्रारणे यामुळे मंगळावरील वातावरणाचा ऱ्हास झाला. सौरवात हा सूर्याच्या पृष्ठभागावरून सुटणारा विद्युतभारित वायूंचा प्रवाह असतो. पूर्वी सूर्याची अतिनील किरणे फारच तीव्र होती, त्यामुळे मंगळावरील वातावरणावर परिणाम झाला. त्याआधी मंगळावर सूक्ष्मजीव असावेत. नंतर मंगळ थंड झाला व तेथील सूक्ष्मजीव नष्ट झाले. मावेनच्या नॅचरल गॅस अँड आयन मास स्पेक्ट्रोमीटरने गोळा केलेल्या माहितीनुसार अब्जावधी वर्षांत मंगळावरील अरगॉन वायू वातावरणात नाहीसा झाला, असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे पॉल महाफी यांनी सांगितले. सँपल अ‍ॅनॅलिसिस अ‍ॅट मार्स या उपकरणाने इतर मापने केली असून ती पूरक आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

Share This Article