Current Affairs – 23 October 2018

0
11

 

CBI War : उपसंचालक राकेश अस्थानांची घर वापसीची शक्यता

Advertisement
 • केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अंतर्गत कलह थांबण्याची चिन्हे नसल्याने अखेर यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर आता भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सीबीआयचे क्रमांक दोनचे अधिकारी आणि सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी पावले उचलली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अस्थाना यांना पुन्हा गुजरातमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी आपल्या सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
 • या प्रकरणात चर्चेसाठी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि अस्थाना यांच्यावरील आरोपांची थोडक्यात माहिती दिली. अस्थाना यांच्यावर हैदराबाद येथील व्यावसायीक सना सतिशबाबू यांनी ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याची तक्रार दाखल केली होती.

बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान

 • स्टार मल्ल बजरंग पूनिया याला जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या १९ वर्षीय ताकुटो ओटुगुरो याने बजरंगचे तगडे आव्हान १६-९ असे परतावत सुवर्ण पदकावर कब्जा केला. मात्र या पराभवानंतरही बजरंगची कामगिरी ऐतिहासिक ठरली असून या स्पर्धेत दोन पदक जिंकणारा पहिला भारतीय मल्ल असा पराक्रम त्याने केला आहे. याआधी २०१३ साली फ्रीस्टाइल ६० किलो वजनीगटात बजरंगने कांस्य मिळवले होते. दुसरीकडे ताकुटोनेही विक्रमी कामगिरी केली असून तो जपानचा सर्वात युवा जागतिक विजेता ठरला.
 • चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात बजरंगने जबरदस्त खेळ करताना सुरुवातीला वर्चस्व राखले होते. मात्र, मोक्याच्यावेळी ताकुटो याने ५ गुणांची शानदार कमाई करत नियंत्रण मिळवले. त्याने सातत्याने बजरंगच्या डाव्या पायावर पकडी करत नियंत्रण मिळवले. यानंतर बजरंगनेही मुसंडी मारताना पिछाडी ४-५ अशी कमी केली. मध्यंतराला ताकुटोने ७-६ अशी एका गुणाची आघाडी मिळवली होती. यानंतर बजरंगकडून बचावामध्ये काही झालेल्या चुकांचा फायदा घेत ताकुटोने जबरदस्त आघाडी घेताना ४ गुणांची कमाई करत १०-६ असे वर्चस्व मिळवले.

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

 • राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली असून अन्न व नागरी पुरवठा विभागातील सहसचिव अभिमन्यू काळे यांची नियुक्ती राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांतील काळे यांची ही तिसरी बदली आहे.
 • भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदानयंत्रातील बिघाड आणि त्या प्रकरणातील प्रशासकीय शिथिलतेमुळे अभिमन्यू काळे यांची तेथील जिल्हाधिकारीपदावरून बदली झाली. त्यांची जालना येथे पाठवण्यात आले, पण प्रशासकीय प्रमुखाची जबाबदारी काळे यांच्याकडे सोपवू नये, असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश असल्याने दोन दिवसांत काळे यांची पुन्हा बदली झाली. अन्न व नागरी पुरवठा विभागात सहसचिव असलेल्या काळे यांना आता महत्त्वाच्या अशा राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले आहे. कामगार आयुक्त एन. के. पोयम यांची बदली दुग्धविकास आयुक्त म्हणून झाली आहे. तर दुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव यांची बदली कामगार आयुक्तपदी करण्यात आली आहे.
 • नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त डी. बी. गावडे यांची बदली नाशिकमध्येच राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागातील उपसचिव एम. जे. प्रदीप चंद्रन यांची बदली अमरावती येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

विदेशात अवैध संपती असलेल्या भारतीयांवर कठोर काइवाई होणार:

 • विदेशात अवैध संपत्ती असलेल्या भारतीयांवर आयकर विभाग टाच आणण्याच्या तयारीत आहे. अवैधरित्या जमा केलेले पैसे आणि मालमत्ता गोळा केलेल्या भारतीयांविरोधात आयकर विभागाने मोहीमच उघडली आहे. अशा भारतीयांविरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 • आयकर विभागाने त्यांच्या विदेशी समकक्ष विभागासोबत मिळून हजारो भारतीयांच्या संपत्ती आणि मालमत्तेची चौकशी सुरु केली आहे. कोणाकडे किती पैसा आला? कोणत्या मार्गाने आला? कोणी कोणती मालमत्ता खरेदी केली याची कसून चौकशी करण्यात येते आहे अशीही माहिती समोर आली आहे.
 • सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस विभागाचे संचालक सुशील चंद्रा यांनीही ही मोहीम सुरु असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
 • काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने 2015 मध्येच कायदा आणला आहे. नव्या कायद्यानुसार अवैध संपत्तीच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 नुसार होणार आहे असेही समजते आहे.

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here