⁠  ⁠

चालू घडामोडी – २२ जुलै २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

देश-विदेश

गृहमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या काश्मीर दौ-यावर
# गृहमंत्री राजनाथ सिंह हे शनिवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौ-यावर जाणार आहेत. काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला मारल्यानंतर काश्मीर खो-यात तणावपूर्ण वातावरण आहे. राजनाथ सिंह हे शनिवारी ११ च्या सुमारास श्रीनगर येथे पोहचतील, त्यांनतर ते जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

आजच्या दिवशी आपल्या राष्ट्रध्वजाला मिळाली होती मान्यता
# प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज हा तो देश स्वातंत्र्य असल्याचे संकेत देत असतो. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक समता आणि समभावाने राहत असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते. मुस्लीम, हिंदू,शीख,इसाई अशा विविध धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे एका ध्वजाच्या छताखाली यावे, असे राष्टपिता महात्मा गांधी यांना वाटत होते. गांधीजींचे हे स्वप्न आजच्या दिवशी २२ जुलै १९४७ रोजी पुर्ण झाले. भारतीय संविधान सभेच्या बैठकीत तीन रंगात दिमाखात फडकणाऱ्या तिरंग्याला मान्यता मिळाली. आज आपल्या राष्ट्रध्वजाला मान्यता मिळून तब्बल ५९ वर्षे पुर्ण झाली.

गुगलने वाहिली गायक मुकेश यांना आदरांजली
# ‘कभी कभी मेरे दिल मै खयाल आता है’ आजही मुकेश यांच्या आवाजातील गाण्यामुळे आपण प्रेमाच्या जादूई नगरीत हरवून जातो. तर कधी ‘दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा’चे बोल कानावर पडतात आणि विरहाच्या आठवणीने हृद्य पिळवटून निघते. हे सगळे आज आठवण्याचे कारण म्हणजे आज हिंदी चित्रपट सृष्टीतले लाडके गायक मुकेश यांचा ९३ वा स्मृतीदिन. त्यानिमित्त्ताने गुगलनेही मुकेश यांचे डुडल बनवून चित्रपटसृष्टीतील या अजराअमर महान गायकाला आदरांजली वाहिली.

क्रीडा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दमदार शतकासह विराटच्या नावे आणखी नवे विक्रम!
# भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अँटिगा कसोटीत दमदार शतक ठोकून कर्णधारी खेळी साकारली. विराटने कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात जम बसवून नाबाद १४३ धावांची खेळी साकारली. कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसाअखेर भारताला ४ बाद ३०२ धावा करता आल्या आहेत. प्रचंड फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने अँटिगा कसोटीतील शतकासह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोहलीने गुरूवारी आपल्या कारकिर्दीतील १२ वे शतक पूर्ण केले. याशिवाय, कोहलीने यावेळी जलदगतीने धावा जमवत कसोटी कारकिर्दीतील तीन हजार धावांचा टप्पा गाठला. तीन हजार धावांचा टप्पा गाठणारा कोहली १९ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, एक कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजच्या भूमीवर शतक ठोकणारा कोहली तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी माजी क्रिकेटपटू कपिल देव कर्णधार असताना १९८२ साली त्यांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये नाबाद १००, तर राहुल द्रविडने २००६ साली १४६ धावांची कर्णधारी खेळी साकारली होती. वेस्ट इंडिजच्या धरतीवर पहिल्याच डावात अर्धशतकाहून अधिक धावसंख्या करणारा कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

ऑलिम्पिक पदकावर ब्राझीलच्या युवतीची छबी
# यंदाच्या ऑलिम्पिक पदकावर ग्रीक देवतेची छबी या वेळी पाहायला मिळणार नसून त्या ऐवजी येथील सौंदर्यवती युवतीची छबी पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिकसाठी पदके तयार करण्याची जबाबदारी शिल्पकार नेल्सन कार्नेरो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी एकूण ५ हजार १३० कांस्य, रौप्य व सुवर्णपदके तयार केली आहेत. नेल्सन यांनी सांगितले, ‘ही पदके तयार करताना नाईके या ग्रीक देवतेच्या चित्रांमुळेच मला प्रेरणा मिळाली. पदके कशी असावीत याचे सर्व हक्क संबंधित स्पर्धा संयोजन समितीकडे दिलेले असतात.

सायना नेहवालला पाचवे मानांकन
# भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी महिलांच्या एकेरीत पाचवे मानांकन मिळाले आहे, तर तिची सहकारी पी.व्ही. सिंधूला नववे मानांकन देण्यात आले आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने गुरुवारी मानांकने जाहीर केली. पुरुष गटात भारताच्या किदम्बी श्रीकांतला नववे मानांकन मिळाले आहे. पुरुष गटात मलेशियाचा ली चोंग वेई याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे, तर महिलांमध्ये स्पेनची कॅरोलिना मरीनला अग्रमानांकन मिळाले आहे. बॅडमिंटनच्या सामन्यांची कार्यक्रम पत्रिका २६ जुलै रोजी निश्चित केली जाणार आहे.

TAGGED:
Share This Article