⁠  ⁠

चालू घडामोडी : २१ नोव्हेंबर २०१९

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 21 November 2019

दूरसंचार क्षेत्राला केंद्र सरकारकडून दिलासा

– वाढत्या कर्जभाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांना दिलासा देताना केंद्र सरकारने ध्वनिलहरींसाठी त्यांनी भरावयाचे उर्वरित हप्ते पुढील दोन वर्षांसाठी न भरण्याची मुभा दिली आहे.

– सरकारच्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या दूरसंचार कंपन्यांना द्यावा लागणाऱ्या रकमेपासून पुढील दोन वर्षांसाठी मोकळीक मिळाली आहे. मात्र या कंपन्यांना याच ध्वनिलहरींसाठी देय असलेल्या रकमेवरील व्याज मात्र भरावे लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारी दूरसंचार कंपन्यांचे दोन वर्षांत विलीनीकरण

– विलीनीकरणासह सरकारी दूरसंचार कंपन्या दोन वर्षांत नफ्यात येतील, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रवि शंकर प्रसाद यांनी बुधवारी संसदेत दिली.

– लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात प्रसाद यांनी सांगितले की, बीएसएनएल व एमटीएनएलचे विलीनीकरण येत्या १८ ते २४ महिन्यांत होईल; त्याचबरोबर ही विलिनीकृत दूरसंचार कंपनी त्यानंतर नफाक्षमही बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

– बीएसएनएल २०१० पासून सातत्याने तोटा नोंदवीत आहे, तर एमटीएनएल गेल्या १० वर्षांत नऊ वेळा वार्षिक तोटय़ाला सामोरे गेली आहे. दोन्ही कंपन्यांवर मिळून ४०,००० कोटी रुपयांचा कर्जभार आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबरमध्ये मंजुरी दिली होती. त्याचबरोबर दोन्ही कंपन्यांमध्ये स्वेच्छानिवृत्ती योजनाही लागू करण्यात आली.

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा’ : सागर कातुर्डेला सुवर्णपदक

c 1

– महाराष्ट्राच्या सागर कातुर्डे याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत आपले स्वप्न साकार केले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या शरीरसौष्ठवपटूंनीही रौप्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताच्या चित्रेश नटेशन याने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

– दक्षिण कोरियातील जेजू आयलंड येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताने सर्वाधिक यश संपादन केले. सहावेळा ‘भारत श्री’ तसेच ‘महाराष्ट्र श्री’ आणि ‘मुंबई श्री’ किताब पटकावणाऱ्या सागरने आपल्या गटात भारताच्याच जयप्रकाश आणि सतीशकुमार यांच्यावर सरशी साधत सोनेरी यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच पदक ठरले. १०० किलो वजनी गटात रोहित शेट्टीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात भारताच्या दयानंद सिंगने सुवर्णपदक पटकावले. वीरेश धोत्रेनेही रौप्यपदकी कामगिरी साकारली.

श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघेंचा राजीनामा

श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना मंत्रिमंडळ गठन करणे शक्य व्हावे यासाठी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्या आधी विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांची भेट घेत चर्चा केली होती. बुधवारी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. राजीनाम्यानंतर विक्रमसिंघे यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारकडे अजूनही बहुमत आहे. मात्र, राष्ट्रपती निवडणुकीत राजपक्षे यांना मिळालेल्या जनादेशाचा आदर करत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे विक्रमसिंघे यांनी सांगितले.गोताबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विक्रमसिंघे यांचे सहकारी साजीथ प्रेमदासा यांना हरवले होते.

सत्या नाडेला फॉर्च्यून बिझनेस पर्सन ऑफ द इयर

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांची फॉर्च्यूनच्या बिझनेस पर्सन ऑफ द इयर २०१९ साठी निवड केली आहे. या यादीत जगातील २० अशा सीईओची निवड केली आहे, ज्यांनी कठीण उद्दिष्ट साध्य केले, अशक्य संधी कॅश केल्या आणि सृजनशील पद्धतीने उपाय शोधला त्यामध्ये नाडेला प्रथम क्रमांकावर राहिले.
यादीत नाडेला यांच्याशिवाय भारतीय वंशाचे अजय बंगा आणि जयश्री उलाल यांना स्थान मिळाले आहे. मास्टर कार्डचे सीईओ बंगा ८ वे आणि अरिस्ताच्या प्रमुख उलाल १८ व्या क्रमांकावर आहेत. फॉर्च्यूनने मंगळवारी ही यादी प्रसिद्ध केली. सत्या नाडेला २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा महसूल सतत वाढत आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मायक्रोसॉफ्टचा नफा ३९ अब्ज डॉलर आणि महसूल १२६ अब्ज डॉलर राहिला. कंपनीचा तीन वर्षांचा एकत्रित वार्षिक महसूल वृद्धी दर ११% आणि नफा वाढ २४% आहे. एप्रिलमध्ये मायक्रोसॉफ्ट प्रथमच १ ट्रिलियन डॉलरच्या बाजार भांडवलावर पोहोचली होती. अॅपलसह जगातील ४ कंपन्याच इथपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. यादीत फॉर्च्यूनकडून जारी केलेल्या निवेदनात नमूद केले की, उद्योग जगतात शांत स्वभावाच्या नेतृत्वाने आपली पकड निर्माण केली आहे. परिणाम आणि टीम आधारित लीडरशिप देण्यात बिझनेसपर्सन ऑफ द इयर सत्या नाडेलापेक्षा जास्त प्रभावित अन्य कुणी केले नाही.

Share This Article