⁠  ⁠

चालू घडामोडी – १८ एप्रिल २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read
देश-विदेश

पाकिस्तानी अल्पसंख्याक निर्वासितांना केंद्राकडून सवलती
भारतात दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात असलेल्या पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना लवकरच मालमत्ता खरेदी करणे, बँक खाती उघडणे आणि पॅन व आधार कार्ड मिळवणे यांसारख्या विशेष सुविधा देण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना आहे. याशिवाय भाजपप्रणित सरकार या समुदायांनी देणार असलेल्या सवलतींमध्ये भारतीय नागरिक म्हणून नोंदणीचे शुल्क १५ हजार रुपयांवरून केवळ १०० रुपये करण्याचाही समावेश आहे..

महाराष्ट्र

कुडाळ नगर पंचायत निवडणुकीत ७३.६३ टक्के मतदान
कुडाळ नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक आज झाली. या निवडणुकीत उमेदवारापेक्षा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीचा प्रचारदेखील विधानसभा निवडणूक धर्तीवरच झाला आहे. उद्या १८ एप्रिलला कोणी कोणाला धूळ चारली हे उघड होणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपने या ठिकाणी स्वबळ दाखविले आहे.

सर्वोत्कृष्ट सागरी पर्यटनस्थळाचा तारकर्लीला सन्मान
मालवण तालुक्यातील तारकर्ली भारतातील सवरेत्कृष्ट सागरी पर्यटनस्थळ आहे. भारतातील पहिला व सर्वात मोठा प्रवासी समूह असलेल्या हॉलीडे आयक्यू या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ‘बेटर हॉलीडे अ‍ॅवॉर्ड २०१६’ अंतर्गत हा सन्मान देण्यात आला आहे. भारतातील करोडो पर्यटकांनी नोंदवलेल्या मतांच्या आधारावर विविध पर्यटन श्रेणीतील भारतातील सवरेत्कृष्ट २४ विजेत्या पर्यटनस्थळांची यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

क्रीडा

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट
रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पध्रेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने अप्रतिम कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. हा पराक्रम करणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात तिने नववे स्थान पटकावले. तिने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई केली. ‘५२.६९८ गुणांची कमाई केल्यानंतर दीपाला ऑलिम्पिक पात्रता मिळेल याची खात्री होती. अजून तीन सबडिव्हीजन बाकी होते, परंतु तिने तीन देशांच्या जिम्नॅस्टिना आधीच पराभूत केले होते. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी वृत्तसंस्थेला दिली.

अर्थव्यवस्था

संपूर्ण ‘पीएफ’ काढण्याचे शेवटचे 12 दिवस
नोकरदार वर्गाला ‘पीएफ‘ची संपूर्ण रक्कम काढायची असल्यास एप्रिल अखेरपर्यंतच पूर्ण रक्कम काढता येणार आहे. मात्र 1 मे नंतर पूर्ण ‘पीएफ‘ कर्मचा-याच्या वय वर्षे 58 नंतरच मिळू शकेल. ‘पीएफ‘ची रक्कम काढल्यास त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्राने ठेवला होता. या प्रस्तावाला चाकरमान्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. परंतु, ‘‘पीएफ‘ची पूर्ण रक्कम काढता येणार नाही‘ हा नियम सरकारने कायम ठेवला आहे. तो 1 मेपासून लागू करण्यात येणार आहे.

TAGGED:
Share This Article