⁠  ⁠

चालू घडामोडी – १५ मार्च २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

विदेश

मदर तेरेसा यांच्या संतपदाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

sant-mother-teresa
मदार तेरेसा

गोरगरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. पोप फ्रान्सिस यांनी आज यासंदर्भातील निर्णय जाहीर असून येत्या ४ सप्टेंबरला मदर तेरेसा यांना संतपदाची पदवी देण्यात येईल. रोमन कॅथलिक चर्चच्या कार्डिनल्सकडून या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. तेरेसा यांनी आपल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेमार्फत गरीब, अनाथ आणि गरजूंची निरलसपणे सेवा केली. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’च्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी
डोकेदुखी आणि सर्दीपासून हमखास आराम मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ या औषधाच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारकडून फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजेच एकाच औषधात दोन ड्रग्ज असणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीने या गोळीचे उत्त्पादन आणि विक्री थांबवली आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी पॅरासिटेमॉल, फेलनेफ्रिन, कॅफीनसारखी औषध बनवते. सरकारने एकूण ३४४ हानिकारक औषधांवर बंदी घातली आहे.Current Affairs Maharashtra

महाराष्ट्र

राज्यात आजपासून जलजागृती सप्ताह
राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती बघता राज्यातील पाणी नियोजन व पाण्याबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या १५ ते २२ मार्च या कालावधीत राज्यभर जलजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जलसप्ताहाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जलसप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन किंवा जलदौड आयोजित करण्यात येणार आहे.maharashtra chalu ghadamodi

क्रीडा

महाराष्ट्राचा सुनीत जाधव ‘भारत-श्री’
रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे रंगलेल्या नवव्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ गटात बाजी मारत ‘भारत श्री’ किताबावर नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या लढतीत सेनादलाच्या मुरली कुमारला मागे टाकत सुनीतने अव्वल स्थान पटकावले. महिलांच्या गटात सरिता राणीने मिस इंडियाच्या किताबावर कब्जा केला. देशभरातील ४७८ शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.Current Affairs For MPSC 2016

रोहित शर्माची क्रिकइन्फो पुरस्काराची हॅट्ट्रिक
भारताचा शैलीदार फलंदाज रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा क्रिकइन्फो पुरस्कारावर नाव कोरले. २०१३ आणि २०१४ मध्ये एकदिवसीय प्रकारातील द्विशतकांकरिता गौरवण्यात आलेल्या रोहितची यंदा ट्वेन्टी-२० प्रकारातील सर्वोत्कृष्ट खेळीसाठी निवड झाली. रोहितने धरमशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साकारलेल्या १०६ धावांच्या खेळीची परीक्षकांनी एकमताने निवड केली. कसोटीमधील सर्वोत्कृष्ट खेळीचा पुरस्कार केन विल्यम्सनने, तर एकदिवसीय खेळीतील सर्वोत्कृष्ट खेळीसाठी ए बी डीव्हिलियर्सची निवड करण्यात आली.

अर्थव्यवस्था

बचत खात्यावरील व्याज तिमाही जमा होणार
ग्राहकांच्या बचत खात्यावरील व्याज तिमाहीला त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, असा निर्देश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंगळवारी सर्व बॅंकांना दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार असून, तीन महिन्याला बचत खात्यावरील व्याज जमा होणार आहे. आतापर्यंत सहा महिन्याला बचत खात्यावरील व्याज ग्राहकाला दिले जात होते.

फेब्रुवारीतील सावरती महागाई!
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास पूरक ठरतील, असे महागाईचे दोन्ही प्रमुख आकडे सोमवारी जाहीर झाले. यानुसार फेब्रुवारीतील किरकोळ महागाई दर घसरत ५.१८ टक्क्य़ांवर स्थिरावला आहे. तर गेल्या महिन्यातील घाऊक महागाई दर सगल १६ व्या महिन्यात नकारात्मक राहिला असून तो ०.९१ टक्के नोंदला गेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास किरकोळ दर महत्त्वाचा ठरतो. त्यातच जानेवारीतील औद्योगिक उत्पादन दरही घसरला आहे. तेव्हा येत्या महिन्यातील पतधोरणामार्फत उद्योग, कर्जदार वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. घसरत्या महागाई दराचे भांडवली बाजारानेही सप्ताहारंभी तेजीने स्वागत केले.

(न्यूज सोर्स – दैनिक लोकसत्ता)

TAGGED:
Share This Article