⁠  ⁠

चालू घडामोडी – १३ जुलै २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 8 Min Read
8 Min Read

देश-विदेश

भारतीय प्राध्यापकाची अमेरिकेमधील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
# भारतीय वंशाचे प्राध्यापक डॉ. कींशुक यांची बुधवारी अमेरिकेतील नामांकित विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक कींशुक यांनी राजस्थान विद्यालयातून आभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी स्कॉलंडच्या स्टेथ क्लाईड विद्यापीठात पदवीत्तोर शिक्षण घेतले. तर इंग्लडच्या मोंट फोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी संपन्न केली आहे. २०१० पासून कॅनडामधील अलबर्टा शहरातील अताबस्का विद्यापीठात ते सहाय्यक कुलगुरु पदावर कार्यरत होते. या विद्यापाठात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नेतृत्व केले. १५ जुलै रोजी प्राध्यापक डॉ.कींशकु नॉर्थ टेक्सास विद्यापीठाच्या कारभाराची सुत्रे हाती घेतील.

अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
# सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला अरूणाचल प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचे आदेश दिले. हा निर्णय केंद्र सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारवर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची नामुष्की ओढवली होती. अरुणाचल प्रदेशमध्ये २६ जानेवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काँग्रेसच्या बंडखोरांनी भाजपच्या पाठिंब्याने स्थापन केलेले सरकार बेकायदा ठरले आहे. अरुणाचलचे राज्यपाल ज्योति प्रसाद राजखोवा यांनी दिलेल्या सर्व आदेशांना असंवैधानिक ठरवून सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश रद्द केले आहेत. न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय घटनाविरोधी असल्याचे सांगत १५ डिसेंबरला असलेली परिस्थिती पूर्ववत करा, असे निकालात म्हटले आहे.

रस्ते सुरक्षेसाठी अमेरिकेचे तंत्रज्ञान सहकार्य
# भारतात रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी अमेरिका आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत करील तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअरही देईल असे रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. रस्ते सुरक्षा हा भारतातील एक प्रमुख प्रश्न असल्याचे मान्य करताना त्यांनी सांगितले की, पाच लाख अपघातात दरवर्षी दीड लाख लोक मरतात अशी वस्तुस्थिती आहे. रस्ते सुरक्षेच्या समस्येत आम्ही अमेरिकी सरकारची मदत घेत आहोत व आधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रस्ते वाहतुकीची भारतात जी स्थिती आहे त्याबाबत आपण अस्वस्थ आहोत.

उत्तरप्रदेशच्या काँग्रेस अध्यक्षपदी राज बब्बर यांची वर्णी
# उत्तरप्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अभिनेता राज बब्बर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी राज बब्बर यांच्या नावाची वरिष्ठांना शिफारस केली होती. त्यानंतर मंगळवारी पक्षाचे महासचिव जनार्दन त्रिवेदी यांनी राज बब्बर यांच्या निवड झाल्याचे जाहीर केले. संजय सिंग, जतीन प्रसाद आणि राजेंद्र मित्र यांची नावे देखील उत्तरप्रदेशच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत होती. राज बब्बर यांनी उत्तरप्रदेशमधून दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. २००९ मध्ये राज बब्बर यांनी त्यांनी डिंपल सिंग यांना पराभूत केले होते. तर गत लोकसभा निवडणुकीत भाजप नेते जनरल व्हि. के. सिंग यांच्याकडून राज बब्बर यांना पराभूत व्हावे लागले होते.

अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपत्तुला आणि सिद्धेश्वर यांचा राजीनामा
# अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपत्तुला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारमधील ७५ वर्षाच्या घरातील मंत्र्यापैकी नजमा या एक होत्या. मंगळवारी नजमा यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. नजमा १९८० पासून राज्यसभेतून मंत्री मंडळात सामिल होत होत्या. १९८५ ते १९८६ आणि १९८८ ते २००४ मध्ये नजमा यांनी राज्यसभेच्या उपसभापती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००४ मध्ये नजमा यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदाचा कारभार मुख्तार अब्बास नक्क्वी यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

अर्थव्यवस्था

आयसीआयसीआय बँकेचे ‘स्वच्छ सोसायटी’ पुरस्कार
# मुंबई : आयसीआयसीआय बँकेने मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील (एमएमआर) स्वच्छ व हरित उपक्रमांची दखल घेण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी निवासी हाऊसिंग सोसायटय़ांसाठी विशेष स्पर्धा घोषित केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट ‘स्वच्छ भारत अभियाना’ची प्रेरणा कायम राखणे हे असून ५० दिवसांच्या कालावधीमध्ये हा उपक्रम निवासी सोसायटींनी केलेल्या ऊर्जा संवर्धन, रेनवॉटर हार्वेिस्टग, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ-हरित तंत्रज्ञानाचा अवलंब अशा प्रयत्नांचे दखल घेईल, त्यांचे मूल्यमापन करेल व त्यांचा गौरव करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य आणि ‘क्लीन क्रुसेडर इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’ अशा श्रेणींतील निवडक प्रवेशिकांना ३० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी यानिमित्ताने मिळेल, असे बँकेने नमूद केले आहे. ‘स्वच्छ सोसायटी अ‍ॅवॉर्डस’ मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, नवी मुंबई व वसई-विरार या महानगरपालिका आणि पनवेल, खारघर, कळंबोली या नगर परिषदांमध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व निवासी सोसायटय़ांसाठी खुले आहेत.

महागाई दराचा २२ महिन्यांचा उच्चांक
# भाज्या, डाळींसह अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमधील किरकोळ किमतीवर आधारीत महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो किरकोळ वाढला असला तरी जवळपास ६ टक्क्यांनजीकची महागाई आता गेल्या २२ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मेमध्ये किरकोळ महागाई दर ५.७६ टक्के, तर वर्षभरापूर्वी जून २०१५ मध्ये दर ५.४० टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित हा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ५ टक्के या सहनशील पातळीपेक्षा अधिक आहे. प्रामुख्याने अन्नधान्यांच्या किमतीचा दर जूनमध्ये ७.७९ टक्के नोंदला गेल्यामुळे एकूण किरकोळ महागाई वाढली आहे. जूनमध्ये भाज्यांच्या किमती १४.७४ टक्के वाढल्या आहेत, तर डाळींचे दर ३.०७ टक्क्यांवर गेले आहेत. डाळींच्या किमती मात्र घसरून २६.८६ टक्क्यांवर आले आहेत. अंडी, मासे, मटण, दूध यांच्या दरांमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. इंधन व ऊर्जा दरदेखील नाममात्र प्रमाणात घसरले आहेत.

क्रीडा

ऑलिम्पिकसाठी भारताचे नेतृत्व श्रीजेशकडे
# रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची निवड करताना आश्चर्यकारक निर्णय घेताना अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर प्रदीर्घ काळ नेतृत्व करणाऱ्या सरदार सिंगला महत्त्वपूर्ण जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये श्रीजेशची गणना केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लंडनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. या स्पध्रेतील गेल्या ३८ वर्षांच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. या स्पध्रेच्या अंतिम फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला गोलशून्य बरोबरीत रोखले. मग वादग्रस्त शूटआउटमध्ये भारताने सामना गमावला.

सुशीला चानू भारतीय महिला संघाची कर्णधार
# बचावपटू सुशीला चानूकडे रिओ ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. खराब कामगिरी आणि गैरवर्तनामुळे संघव्यवस्थापनाने कर्णधार रितू राणीला भारतीय संघातून वगळल्यानंतर हॉकी इंडियाने सुशीलाकडे कर्णधारपद सोपवले, दीपिका उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारतीय संघात पाच बचावपटू, पाच मध्यरक्षक, पाच आघाडीपटू आणि एक गोलरक्षक सविता यांचा समावेश आहे. या संघात अनुभवी दीपिका, सुनीता लाक्रा, सुशीला, नमिता टोप्पो आणि दीप ग्रेस इक्का बचावाची धुरा सांभाळतील. रेणुका लिमा मिन्झ, मोनिका, नवज्योत कौर आणि युवा निक्की प्रधान यांच्याकडे मध्यरक्षणाची जबाबदारी असेल. तर सातत्यपूर्ण कामगिरी बजावणारी राणी रामपाल, पूनम राणी, वंदना कटारिया, अनुराधा देवी ठोकच्योम आणि प्रीती दुबे हे खेळाडू आक्रमणाच्या फळीत असतील.

कसोटी क्रमवारीत भारतासह आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर
# वेस्ट इंडिज दोऱ्यापुर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताच्या फिरकीपटू आर. अश्विन याची दुसऱ्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. आयसीसीने मंगळवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने इंग्लडच्या अॅंडरसनने कसोटीतील अव्वल स्थान गमावले आहे. अश्विनने अॅंडरसला सहा अंकानी मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाची जागा मिळवली. अष्टपैलूच्या यादीतील अव्वल स्थान अश्विनने कायम राखले आहे. दुसरीकडे गोलंदाजीच्या यादीत इंग्लडच्या स्टूअर्ट ब्रॉडने तिसऱ्या स्थानावरुन अव्वल स्थानी झेप घेत अॅंडरसनची जागा घेतली आहे. दरम्यान, भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पाकिस्तानला एका अंकाच्या पिछाडीवर ठेवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १११ गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड १०७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

TAGGED:
Share This Article