⁠  ⁠

चालू घडामोडी : १२ जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

Current Affairs 12 June 2020

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

dgree
  • राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळाले आहे. क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील १२ संस्था आणि विद्यापीठ गटात १३ संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही क्रमवारीत महाराष्ट्राला द्वितीय स्थानच मिळाले होते.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही यादी गुरुवारी जाहीर केली. शैक्षणिक संस्थांमधील अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण गटामध्ये आयआयटी मद्रास प्रथम स्थानी आहे, तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळूरु दुसऱ्या स्थानी आहे.
  • सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे (४), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (२५), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (३०), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (३४), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (५७), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (७३), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (७५), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (९२), मुंबई विद्यापीठ (९५), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (९७), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (९८) या संस्थांचा समावेश आहे.
  • विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (१४), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (१८), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (३४), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (३४), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (४६), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (५७), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (६१), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (६३), मुंबई विद्यापीठ (६५), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (६९), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई (७७), कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराड (९०) यांना स्थान मिळाले.
  • मुंबई विद्यापीठाला स्थान
  • राज्यातील आघाडीचे विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण गटातील स्थान दोन क्रमाकांनी घसरले आहे. विद्यापीठ गटात एका स्थानाने उंचावले आहे. गेल्या वर्षी पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात स्थान न मिळालेल्या मुंबई विद्यापीठाला यंदा ९५ वे स्थान मिळाले आहे.
  • तमिळनाडूची यंदाही आघाडी
  • क्रमवारीमध्ये तामिळनाडू गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आघाडीवर आहे. तमिळनाडूच्या सर्वाधिक अठरा संस्थांचा समावेश आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राच्या बारा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी सात, केरळमधील सहा संस्थांचा समावेश आहे.
  • विद्याशाखानिहाय यादी
  • विद्याशाखानिहाय शिक्षण संस्थांचीही स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. त्यात महाविद्यालय गटात तीन, अभियांत्रिकीच्या १०, औषधनिर्माणशास्त्राच्या १८, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तीन, विधी अभ्यासक्रमाची एक, दंतवैद्यकीयच्या तीन संस्थांना स्थान मिळवता आले. तर वास्तुकला अभ्यासक्रमाच्या एकाही संस्थेला क्रमवारीत स्थान मिळाले नाही.

लॉकडाउनमुळे भारताच्या महत्वकांक्षी ‘मिशन गगनयान’चं उड्डाण रखडणार

isro
  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा भारताच्या पहिल्या मानवरहित मिशन गगनयान मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
  • चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाउन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.
  • “करोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसं सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही.
  • इस्रोनं सध्या मिशन गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या मोहिमेतंर्गत सुरूवातीला मानवरहित दोन फ्लाईट्स पाठवण्याचं नियोजन संस्थेनं केलं आहे. यातील पहिली फ्लाईट्स डिसेंबर २०२० मध्ये, तर दुसरी फ्लाईट जुलै २०२१ मध्ये पाठवण्यात येणार आहे.

जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल

  • जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
  • अहवालानुसार –
  • 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
  • महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे.
  • 2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.
  • 2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.
  • दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत.
  • सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
  • जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे.
  • वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.

Share This Article