⁠  ⁠

Current Affairs 11 April 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 5 Min Read
5 Min Read

1) मॉरिशसमध्ये ११ वे विश्व हिंदी संमेलन

हिंदी भाषेचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यासाठी अकरावे विश्व हिंदी संमेलन येत्या १८ ते २० ऑगस्टदरम्यान मॉरिशसमध्ये आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. १९७६ व १९९३ साली विश्व हिंदी संमेलन मॉरिशसमध्ये भरविण्यात आले होते. याच क्रमात तिसऱ्यांदा हिंदी संमेलन मॉरिशसमध्ये आयोजित केले जात आहे. यंदाच्या संमेलनासाठी स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय संस्थानला सभा केंद्र म्हणून निवडण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे. ‘जागतिक स्तरावरील हिंदी आणि भारतीय संस्कृती’ हे यंदाच्या संमेलनाचे शीर्षक असणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला मॉरिशसमध्ये गंगा आरतीचे आयोजन केले जाणार आहे. गंगेला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. संपूर्ण जगात गंगेला मातेचा दर्जा देण्यात येतो. ११ व्या विश्व हिंदी संमेलनात ‘भोपाळ ते मॉरिशस’ या विषयावर मंथन होणार आहे. दहावे विश्व हिंदी संमेलन भोपाळमध्ये पार पडले होते.

2) देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल

देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल झाले असून, यामुळे देश आता चीन, जर्मनी, रशिया आणि स्वीडन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. तब्बल १२ हजार अश्वशक्तीच्या या इंजिनमुळे रेल्वेगाड्या ताशी १२० किमी वेगाने धावू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मधेपुरा येथील ग्रीनफिल्ड इले्ट्रिरक लोकोमोटिव्ह कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या देशाच्या पहिल्या १२ हजार अश्वशक्तीच्या इंजिनलाही मोदींना हिरवा झेंडा दाखविला. भारतीय रेल्वेत सध्या ६ हजार अश्वशक्तीचे इले्ट्रिरक इंजिन कार्यरत आहेत. या नव्या इंजिनमुळे प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता थेट दुप्पट झाली आहे. फ्रान्सच्या एल्सटॉम कंपनीच्या मदतीने या इले्ट्रिरक हायस्पीड लोकोमोटिव्हची निर्मिती करण्यात आली आहे. या इंजिनमुळे ताशी १२० किमी वेगाने रेल्वे धावू शकेल. ६ हजार टन वजन खेचण्यास हे इंजिन सक्षम आहे. प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी हे इंजिन वापरण्यात येईल. अशा प्रकारचे रेल्वे इंजिन आतापर्यंत केवळ रशिया, चीन, स्वीडन आणि जर्मनी याच देशांकडे होते.

मेक इन इंडियाअंतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील ११ वर्षांत असे ८०० इंजिन तयार करणार आहे. या इले्ट्रिरक हायस्पीड लोकोमोटिव्हसाठी प्रत्येकी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च येतो. पर्यावरणाचा आणि भारतीय परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आलेले हे इंजिन अत्यंत थंड आणि उष्ण वातावरणातही कार्यरत राहू शकते.

3) राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष

देशातील सात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७च्या प्राप्तिकर विवरणपत्रांवरून दिसून येते. उत्पन्नाच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भाजपाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत आहे.
या राजकीय पक्षांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांचे विश्लेषण करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म््स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने एक तौलनिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या वर्षी भाजपाने १,०३४.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले. सर्व पक्षांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार केला तर त्यातील एकट्या भाजपाचा वाटा ६६.३४ टक्के आहे.
काँग्रेसला गेल्या वर्षी एकूण २२५.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले तर या पक्षाने ३२१ कोटी रुपयांचा खर्च केला. याउलट बहुजन समाज पक्षाचे (बसपा) ७० टक्के, भाजपाचे ३१ टक्के तर भारतीय कम्युन्स्टि पक्षाचे सहा टक्के उत्पन्न वर्षअखेर खर्च न होता शिल्लक राहिले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.
गेल्या वर्षी या सात राजकीय पक्षांनी मिळून १,५५९.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न व एकूण १,२२८ कोटी रुपयांचा खर्च जाहीर केला. या पक्षांच्या उत्पन्नात ऐच्छिक देणग्यांचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ७४ टक्के (१,१६९ कोटी रु.) होता. त्याखालोखाल बँकांमधील ठेवींवरील व्याज (१२८ कोटी रु.) व कूपन विक्री (१२४ कोटी रु.) यातून या पक्षांना प्रमुख उत्पन्न मिळाले.
या अहवालातून समोर आलेली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी भाजपाचे उत्पन्न ४६४ कोटी रुपयांनी (८१ टक्के), बसपाचे उत्पन्न २१६ कोटी रुपयांनी (२६६ टक्के) तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्पन्न सुमारे नऊ कोटी रुपयांनी (८८ टक्के) वाढले. काँग्रेसचे उत्पन्न मात्र ३६ कोटी रुपयांनी (१४ टक्के) घटले. अशीच घट तृणमूल काँग्रेस (८१ टक्के) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (६ टक्के) उत्पन्नातही दिसून आली.

4) शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रिटनला जाणार मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ हेड ऑफ गव्हर्नमेंट’च्या शिखर संमेलनात सहभागी होतील. हे संमेलन 18-19 एप्रिल रोजी होईल. मोदी 17 एप्रिलला लंडनला पोहोचतील आणि येथे अनेक द्विपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. यादरम्यान त्यांचे दोन प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमही होतील. एक सायन्स म्यूजियममध्ये आणि दुसरे क्रिस इन्स्टीट्यूटमध्ये. या दोन्ही ठिकाणी असलेल्या गेस्ट लिस्टवर भारताच्या विदेश मंत्रालयाची नजर आहे. कारण 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून पळून गेलेला विजय माल्ल्या या कार्यक्रमांत सामील होऊ नये यासाठी मंत्रालय विशेष दक्षता घेत आहे.

Share This Article