⁠  ⁠

चालू घडामोडी : ०४ जानेवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 04 january 2020

स्वच्छ सर्वेक्षण 2019-20 च्या तिमाहीत मुंबई आठव्या क्रमांकावर

यंदाच्या 2019-20 वर्षातील स्वच्छ भारत’अभियानाअंतर्गत पहिल्या दोन तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक सर्वेमध्ये मुंबईचा घसरलेला क्रमांक सावरला आहे. नुकत्याच सरलेल्या वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबईला 13 वा, तर दुसऱ्या तिमाहीमध्ये आठव्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे. तथापि, मुंबईतील शौचालयांची संख्या, राखण्यात येणारी स्वच्छता, मालमत्ता करामध्ये अंतर्भूत केलेलं कचराविषयक शुल्क, बंदीयोग्य प्लास्टिकवर करण्यात आलेली कारवाई याबाबत सादर केलेल्या माहितीच्या आधारे मुंबईला देशातील पहिल्या 20 शहरांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
पालिकेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे 2019-20 या वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशभरातील शहरांमध्ये मुंबईला 13 वा क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीमध्ये मुंबईने आठवा क्रमांक पटकावला.
स्वच्छ सर्वेक्षणात 2016-17 मध्ये मुंबईला 29 वा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर 2017-18 मध्ये मुंबईने 18 वा क्रमांक पटकावला होता. मात्र 2018-19 मध्ये सर्वेक्षणाच्या निकषांची पूर्तता करण्यात पालिका अपयशी ठरली आणि त्यामुळे मुंबईचा क्रमांक 49 वर घसरला होता. मात्र, या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत मुंबईला 13 वे आणि दुसऱ्या तिमाहीत आठवे स्थान देण्यात आले आहे.

देशभरात २,६३६ नवी चार्जिंग केंद्रे

charging

देशभरातील ६२ शहरांमध्ये २,६३६ नवी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही स्टेशन्स २४ राज्यांत असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी दिली.
ई वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने फेम (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) ही योजना दाखल केली आहे. देशभरात अधिकाधिक चार्जिंग केंद्र उभारण्याच्या उद्दिष्टाच्या एक एक भाग म्हणून या नव्या स्टेशन्सना मंजुरी देण्यात आली असून चार किलोमीटरच्या परिघात एक चार्जिंग स्टेशन उपलब्ध होईल, अशा नियोजनातून ही केंद्र उभारली जाणार आहेत. ही केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारने इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागवल्या आहेत. ही केंद्र उभारणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर सवलतही देण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा : हणमंत, आबासाहेब यांची सोनेरी कामगिरी

spt02 1

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिले सुवर्ण सोलापूर व उस्मानाबादच्या मल्लांनी आपल्या नावे केले.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या स्पर्धेत ५६ किलो गटात सोलापूर जिल्ह्याच्या आबासाहेब अटकळे आणि ७९ किलो गटात उस्मानाबादच्या हनमंत पुरीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
माती गटातील ५६ किलो गटात फायनलमध्ये आबासाहेबने कोल्हापूर शहरच्या संतोष हिरुगुडे सोबत रोमांचक लढत पाहायला मिळाली. दोघांतील सामना ८-८ गुणांनी बरोबरी साधली. त्यानंतर अखेर गुण मिळत आबासाहेबने आपल्या जिल्ह्याच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. विशेष म्हणजे, हे दोघे कात्रज तालमीमध्ये सोबत सराव करतात. त्याचप्रमाणे गादी विभागात ७९ किलाे गटात सोलापूरच्या रामचंद्र कांबळेने कोल्हापूरच्या नीलेश पवारला १३-४ गुणांनी एकतर्फी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश करत आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तिसरे पदक निश्चित केले.

Share This Article