⁠  ⁠

Current Affair 16 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

चीनची ऐतिहासिक कामगिरी; चंद्रावर उगवले कापसाचे बियाणे

  • चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. चीनला चंद्रावर कापसाचे बियाणे उगविण्यात यश मिळाले आहे.
  • चंद्रावर उगविण्यात आलेला हा जगातील पहिला जैविक घटक आहे. चीनच्या महत्वकांक्षी ‘चांग ई-४ ’ मिशनसोबत कापसाबरोबर इतर बियाणे देखील पाठविण्यात आले होते.
  • मात्र, यापैकी कापसाचे बियाणला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे ऐतिहासिक यश मानले जात आहे.
  • नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी चीनने ‘चांग ई -४’ हे यान पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या बाजूवर उतरविण्याचा कारनामा करून दाखविला होता.
  • या महत्वकांक्षी मोहिमेसोबत चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही उपकरण पाठवून देण्यात आले होते. यानंतर लागलीच याठिकाणी पहिला जैवप्रयोग करण्यात आला.
  • ‘चांग ई -४’ या मोहिमेसोबत वैज्ञानिकांनी बकेट सारखा एक विशेष धातूचा डब्बा पाठवून दिला होता. यामध्ये माती, पाणी व हवेची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर कापूस, रेपसीड, बटाटा, अरबीडॉप्सिसच्या बियाणांबरोबर मधमाशांचे अंडे व किन्व पाठवून देण्यात आले होते.

मनु सॉनी यांची आयसीसीच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदी निवड

  • इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मनु सॉनी यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी निवड केली आहे. मनु सॉनी यांच्याकडे याआधी सिंगापूर स्पोर्ट्स हबचं सीइओपद होतं. तसंच ESPN स्टार स्पोर्ट्सचं मॅनेजिंग डायरेक्टरपदही भुषवलं. आता मात्र त्यांना आयसीसीने चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे पद दिले आहे.
  • शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यानंतरचा एक मोठा हुद्दा असलेले पद पुन्हा एकदा भारतीय माणसाकडेच आलं आहे. मनु सॉनी यांच्याआधी आयसीसीचे चीफ एक्झिक्युटिव्ह पद हे डेव्हिड रिचर्डसन यांच्याकडे होते. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपला असून या पदावर मनु सॉनी यांची निवड करण्यात आली आहे. मनु सॉनी यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव आहे.

ब्रिटनच्या संसदेला ‘ब्रेक्झिट’ अमान्य

  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ‘ब्रेक्झिट’ करार हा ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळून लावला आहे. ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात या संदर्भात मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत ४२३ मते ही कराराच्या विरोधात पडली तर २०२ मते ही कराराच्या बाजूने असल्याचे दिसून आले.
  • सुमारे अडीच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या जनतेने युरोपियन युनियन सोडण्याचा कल दिला होता. त्यानुसार २९ मार्च २०१९ रोजी युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, असे निश्चित झाले होते. पण त्याआधीच ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. ब्रिटनने ‘लिस्बन’ कराराचे ५० वे कलम लागू करून ‘ब्रेक्झिट’च्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सलोख्याचे संबंध टिकून राहावेत, यासाठी करार केला जात आहे.

कॉन्स्टन्टाइन यांचा राजीनामा

  • आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कॉन्स्टन्टाइन यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
  • यापूर्वी २००२ ते २००५ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कॉन्स्टन्टाइन यांचा हा प्रशिक्षकपदाचा दुसरा कार्यकाळ होता.
  • कॉन्स्टन्टाइन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत १७३व्या क्रमांकावरून ९६व्या स्थानी झेप घेतली होती.
Share This Article