⁠  ⁠

Current Affair 10 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

एच १ बी व्हिसा रोखण्याच्या प्रमाणात वाढीबाबत चिंता

  • अमेरिकेकडून एच १ बी व्हिसा रोखला जाण्याचे प्रमाण नाटय़मयरीत्या वाढले आहे, असे कॉम्पिट इंडिया या अमेरिकी नियोक्ता कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या गटाने म्हटले आहे. त्यात गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.
  • एच १ बी व्हिसा हा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक व कंपन्यांमध्ये लोकप्रिय असून, तो अस्थलांतरित दर्जाचा व्हिसा असतो. त्यात अमेरिकी कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेता येते. विशेष करून जेथे तंत्रकुशलता आवश्यक असेल अशा पदांसाठी कर्मचारी भरताना त्याचा उपयोग केला जातो. तंत्रज्ञान कंपन्या या एच१ बी व्हिसावर अवलंबून आहेत. त्यात भारत व चीन यांच्या कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर प्राधान्य मिळत असून, दरवर्षी हजारो कर्मचारी या व्हिसावर अमेरिकेत जातात. एच १ बी व्हिसा देण्याच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले असून ते या व्हिसाचे प्रमाण कमी करणारे व उमेदवारांना व्हिसा देण्यास रोखून धरणारे आहेत, असे मत कॉम्पिट अमेरिका या गटाने अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी किर्सजेन निलसन व अमेरिका नागरिकत्व व स्थलांतर विभाग म्हणजे युसीसचे संचालक फ्रान्सिस सिसना यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
  • एच १ बी व्हिसाची मर्यादा वार्षिक ६५००० असून त्यातील पहिले वीस हजार व्हिसा हे अमेरिकेत मास्टर्स पदवी किंवा उच्च शिक्षण असलेल्यांना प्रामुख्याने दिले जातात

दुष्काळात अधिकाधिक रोजगारनिर्मितीला चालना

  • दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मनरेगा योजनेबरोबरच सामूहिक शेततळे, सामूहिक मत्स्यतळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, काँक्रीट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाकघर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला यांसारख्या इतर विभागांच्या योजनांतील २८ कामे आता अभिसरण नियोजन आराखडय़ाअंतर्गत करता येतील. त्यामुळे राज्य-जिल्हास्तरीय योजनेतून अधिक प्रमाणात कामे घेता येतील.
  • राज्यात मनरेगा अंतर्गत ११ कलमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत ग्रामीण भागात या योजनेंतर्गत आठ लाख १३ हजार १२३ कामे करण्यात आली. त्यातून कोटय़वधी मजुरांना रोजगार मिळाला. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ३० हजार ८९८ विहिरी आणि ९७ हजार २०१ शेततळी बांधण्यात आली आहेत. त्यातून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.
  • मनरेगा योजनेतून आतापर्यंत २३ हजार ८९७ पाणंद रस्ते बांधले गेले आहेत. अंकुर रोपवाटिका योजनेतून २० कोटी ७५ लाख रोपनिर्मिती करण्यात आली आहे.

अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ट्रम्प यांनी २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याबाबत तपास सुरू आहे.
  • सेशन्स यांनी या तपासापासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्यावर जाहीररीत्या टीका चालविली होती. काळजीवाहू अटर्नी जनरल आणि रिपब्लिकन पक्षाशी निष्ठ असलेले मॅथ्यू जी व्हिटकर हे आता सेशन्स यांची जागा घेतील. रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या चमूचे नेतृत्व रॉबर्ट मुल्लर यांच्याकडे असून व्हिटकर हे त्यांचे विरोधक मानले जातात. सेशन्स यांना पदावरून हटविल्यानंतर ट्रम्प यांनी टिष्ट्वट जारी करीत म्हटले की, न्यायालयीन विभागाचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या जागी चीफ आॅफ स्टाफ मॅथ्यू जी व्हिटकर यांची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. ते आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करतील. व्हिटकर यांच्या सेवेसाठी मी त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. यानंतर त्यांच्या कायम नियुक्तीची घोषणा केली जाईल.

जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धा : मनू भाकर-सौरभ चौधरीला सुवर्ण

  • नेमबाजीतील भारताचे नवे तारे मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटात विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • भारताच्या कनिष्ठ संघाने या चॅम्पियनशीपमध्ये ४ सुवर्णपदकांसह ११ पदकांची कमाई केली. मनू आणि सौरभ यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अगदी प्रारंभापासूनच वर्चस्व गाजवले.
  • त्यामुळे प्रारंभापासूनच त्यांना पदक मिळण्याबाबत शाश्वती होती. अखेरीस त्यांनी विश्वविक्रमी ४८५.४ गुणांची वसुली करीत सुवर्णपदक तर चीनच्या खेळाडूंनी ४७७.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या अजून एका संघाने कांस्यपदक मिळवले. भारताच्या अभिज्ञा पाटील आणि अनमोल जैन या जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या सौरभचे गत दोन दिवसांमधील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. त्याआधी त्याने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदकावर ठसा उमटवला होता.
Share This Article