एमपीएससी : रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी

0
37

रसायनशास्त्र

 • या घटकावरचे प्रश्न थेट आणि अधिक वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात. या घटकाचा अभ्यास करताना मुद्दय़ांचा योग्य क्रम ठरवून घेतला आणि मागील प्रश्नांची ओळख करून घेतली तर हा घटकही ‘गुणवर्धक’ आहे.

रसायनशास्त्राचा अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांवर भर देणे आवश्यक आहे.

Advertisement
 • द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातूसदृश धातुके, संयुग व त्यांची निर्मिती, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे, मिश्रण व त्यांची निर्मिती.
 • वरील मुद्दय़ांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. यासाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी तसेच नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या मुद्दय़ांच्या उपयोजनाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत असे दिसून येते. थिअरी समजली की उपयोजन समजणे फारसे अवघड वाटत नाही.
 • काही प्राथमिक स्वरूपाच्या अभिक्रियांवर प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक पाहणे आवश्यक आहे.
 • विज्ञानाच्या इतर घटकांच्या तुलनेत या विषयामध्ये एक शिस्तबद्धता आहे. या विषयावर साधारणपणे ३ ते ४ प्रश्न विचारले जातात आणि तेही वर मांडलेल्या मुद्दय़ांवरच! त्यामुळे मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिकांमध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत त्यासंबंधी अधिक माहितीचा समावेश आपल्या नोट्समध्ये करायला हवा.
 • रसायनशास्त्राच्या प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण केल्यास अवघड प्रश्न सोडवायला एलिमिनेशन पद्धत उपयोगी ठरते हे दिसून येते. उत्तर माहीत नसेल आणि बहुविधानी प्रश्नांमध्ये किमान दोन चुकीची उत्तरे बाद करता आली तर योग्य उत्तर कॉमन सेन्सने देणे शक्य होऊ शकते हे लक्षात ठेवावे.
 • भौतिकशास्त्र
 • मागील प्रश्नपत्रिकांचे एकत्रितपणे बारकाईने विश्लेषण केले तर लक्षात येते की, भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारित असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणितेसुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्या उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो.
 • बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापनपद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्दय़ांच्या स्वरूपात पुरेशा ठरतात. त्यामुळे सर्व मिळून एक ते दोन पानांमध्ये मावतील इतक्या काढल्या तरी चांगली तयारी होते.
 • प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित असे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुद्दय़ांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • सर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठय़ा घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.
 • गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.
 • भौतिकशास्त्राच्या तयारीसाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाचा जुनी तसेच नवीन (नवीन पुस्तके अधिक उपयुक्त) पुस्तके वाचणे आवश्यक आहे तसेच सोबत (ल्युसेंटचे) General Science हे पुस्तक वाचल्यास त्याचा अधिक फायदा होईल.
 • विज्ञान विषयाच्या संज्ञा व संकल्पना यांची ओळख असलेल्या उमेदवारांसाठी आणि ज्यांची या घटकाशी फारशी दोस्ती नाही त्यांच्यासाठीही आणखी एक गोष्ट करणे आवश्यक आहे. अभ्यास, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वाचन, आकलन, नोट्स, उजळणी हे टप्पे तर हवेतच, पण त्याचसोबत जुने आणि नवे दोन्ही प्रश्न सोडवायचा सराव अतिशय गरजेचा आहे. किंबहुना प्रश्न सोडवण्यातूनच या घटकाची उजळणी केली तर ती अधिक फायद्याची ठरेल.

-रोहिणी शहा
सदर लेख हा दैनिक लोकसत्तामधून घेण्यात आला आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here