एमपीएसीच्या प्रोफाइलमध्ये उमेदवारांना वैयक्तिक माहिती अपडेट करता येणार

0
221

काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल आयडी किंवा परीक्षार्थी उमेदवाराची वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यास सुविधाच उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे चुकीच्या माहितीचा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागत होता. त्यामुळे अखेरीस स्वत:च्या जबाबदारीवर ही माहिती अद्ययावत करण्याची परवानगी आयोगाने दिली असून आता उमेदवारांना त्यांची योग्य ती माहिती एमपीएसीच्या प्रोफाइलमध्ये अपडेट करता येणार आहे.

काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली होती. यासाठी ऑनलाइन पद्धतीने एमपीएससीच्या प्रत्येक परीक्षार्थीचे प्रोफाइल तयार करण्यात आले होते. पण पहिल्यांदा सेव्ह करण्यात आलेल्या प्रोफाइलमधून उमेदवारांना त्यांची वर्गवारी, शैक्षणिक अर्हता, अनुभव याशिवाय इतर माहिती बदलता येत नव्हती. इतर माहितीमध्ये मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, उंची, वजन आदी माहितीचा समावेश होता. ही इतर माहिती अद्ययावत करण्याची सुविधा यात लॉक करण्यात आली होती. परिणामी, संपर्काचे संदर्भ बदलल्याने ऑनलाइन अर्ज भरताना मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपीसारखी माहिती हाती नसल्याने अनेकांना परीक्षांचा अर्जच भरता येत नव्हता. यामुळे परीक्षार्थींनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगास संपर्क करून याबाबत तक्रारी केल्या होत्या. शिवाय प्रोफाइलमधील वैयक्तिक माहिती अपडेट करण्याची सुविधा देण्याची मागणीही जोर धरू लागली होती. त्यामुळे आयोगाने ही परवानगी देऊन उमेदवारांना दिलासा दिला आहे. नव्या सुविधेनुसार उमेदवारांनी प्रोफाइल अद्ययावत करताना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊ नये किंवा एका उमेदवाराचे एकापेक्षा जास्त प्रोफाइल तयार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here