⁠  ⁠

चालू घडामोडी : ०७ ऑक्टोबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान

भारतीय उपखंडातील सामरिक क्षमतेची समीकरणे बदलून भारताचे पारडे जड करणारे पहिले ‘राफेल’ विमान स्वीकारण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: फ्रान्सला जाणार असून, त्यानंतर ते तेथे भारतीय परंपरेनुसार शस्त्रपूजनही करणार आहेत.
फ्रान्सकडून घ्यायच्या एकूण ३६ ‘राफेल’ विमानांपैकी पहिले विमान भारताकडे सुपुर्द करण्यासाठी येत्या मंगळवारचा दसरा आणि भारतीय हवाईदलाचा ८७वा वर्धापन दिन असा दुहेरी मुहूर्त निवडण्यात आला आहे. त्यानिमित्त राजनाथ सिंग सोमवारपासून तीन दिवस फ्रान्सच्या दौºयावर जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग गेली अनेक वर्षे दसºयाच्या दिवशी न चुकता शस्त्रपूजन करण्याची परंपरा पाळत आले आहेत. गेल्या सरकारमध्ये गृहमंत्री असतानाही त्यांनी असे शस्त्रपूजन केले होते. तीच परंपरा कायम ठेवून पहिले ‘राफेल’ स्वीकारल्यानंतर यंदाचे शस्त्रपूजन ते फ्रान्समध्ये करतील.
पहिले ‘राफेल’ भारताकडे सुपुर्द करण्याचा औपचारिक समारंभ पॅरिसपासून सुमारे ५९० किमी अंतरावर असलेल्या बॉर्डेक्स या बंदराच्या शहरात असलेल्या दस्साँ एव्हिएशन कंपनीच्या कारखान्यात होणार आहे. हा समारंभ झाल्यानंतर तेथेच राजनाथ सिंग शस्त्रपूजन करतील व नंतर ‘राफेल’ विमानातून एक फेरफटकाही मारतील, असे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी सांगितले. फ्रान्सच्या सशस्त्र सैन्यदलांच्या मंत्री फ्लॉरेन्स पार्ले याही यावेळ आवर्जून उपस्थित असतील.

प्रज्ञानंद, आर्यन संयुक्तपणे आघाडीवर

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कडवी झुंज देत इराणचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर्यन घोलामीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे सहाव्या फेरीअखेर प्रज्ञानंद आणि आर्यन यांनी १८ वर्षांखालील खुल्या गटात पाच गुणांनिशी संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले आहे. महिलांमध्ये अग्रमानांकित दिव्या देशमुख हिने शानदार विजयाची नोंद करत विजेतेपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे.
पवई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना द्वितीय मानांकित प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा अवलंबला होता. संपूर्ण लढतीत आर्यन घोलामीचे पारडे जड होते. पण प्रज्ञानंदने सुरेखपणे चाली रचत ३९व्या चालीला ही लढत बरोबरीत सोडवली. भारताचा ग्रँडमास्टर पी. इनियन याने जर्मनीच्या व्हॅलेंटिन बकेल्सविरुद्ध विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ५० चालीनंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले. इनियन ४.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कझाकस्तानच्या लिया कुरमांगालियेव्हा हिला पराभूत केले. भारताची रक्षिता रवी, हॉलंडची एलिन रोबर्स आणि रशियाची एकतारिना नासीरोव्हा यांनी पाच गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले असून त्याखालोखाल दिव्याने ४.५ गुण मिळवले आहेत.

रमाई आवास योजनेंतर्गत ४८१६ घरकूल पूर्ण

जिल्ह्यातील रमाई आवास योजनेची वाटचाल कासवगतीने सुरु आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात शासनाने रमाई आवास योजनेतून ९६७५ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ८ हजार ८८८ घरकूले मंजूर केले. त्यापैकी ४ हजार ८१६ घरकुले संबंधित लाभार्थ्यांनी पुर्ण केले आहे. म्हणजे अजूनही ४ हजार ०७२ घरे अपूर्ण आहेत.
या योजनेची अपेक्षीत उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या आवास योजनेतील घरकुल पूर्ण करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केल्याचा दावा करीत असले तरी गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ४०७२ घरकुल रखडले असल्याची धक्कादायक माहिती आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी शासनातर्फे रमाई आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भाग, नगर परिषद हद्दीत संबंधित यंत्रणेमार्फत योजना राबविली जाते. ग्रामीण भागाचा विचार केल्यास साधारण एक लाख ३० हजार रुपयांचे अनुदान शासनाचे, तर १८ हजार ९० रुपयांचे अनुदान रोहयोच्या मंजुरीपोटी दिली जात असते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजना राबविली जात आहे.
रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात १०३५ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १०२५ घरकुले मंजूरपैकी केवळ ९०७ घरकुल पुर्ण करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ७१४० घरकुलांची उद्दिष्ट होते. त्यापैकी ६७६६ मंजूर घरकुलपैकी केवळ ३८२५ घरकुल पुर्ण झाली.

Share This Article