⁠  ⁠

चालू घडामोडी – १ जुलै २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

‘तेजस’ आज हवाई दलात दाखल
# देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱया अर्थाने भारतीय हवाई दलात दाखल झाले. डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱया या प्रकल्पातील दोन विमानं आज सेवेत दाखल झाली. हवाई दलामध्ये समावेश होताना “स्क्वाड्रन ४५ ” अशी ‘तेजस’च्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल.

देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा ११ जुलैपासून बेमुदत संप
# विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलपासून देशभरातील रेल्वे कर्मचारी, अधिकारी बेमुदत संपावर जाणार असून रेल्वेचा चक्काजाम करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे एम्प्लॉईज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आंदोलनात देशभरातील सुमारे ३४ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावाही संयोजकांनी केला. सातवा वेतन आयोग रद्द करावा, रेल्वेसह कोणत्याही महत्त्वाच्या सरकारी उद्योग व प्रकल्पात विदेशी गुंतवणुकीला प्राधान्य देऊ नये, यासह अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलपासून बेमुदत रेल्वे बंदची हाक दिली आहे. या बाबतचे निवेदन केंद्र सरकारला गतवर्षी नोव्हेंबरमध्ये देण्यात आले. त्यानंतर चार वेळा दिल्लीत बठका होऊनही कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. एवढेच नव्हे तर सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत आम्ही सरकारचे लक्ष वेधले असता सरकारने इम्पोर्ट कमिटी स्थापन केली. त्यात विविध खात्यांचे केंद्रीय सचिवही होते. परंतु समितीने दिलेल्या अहवालालाही केंद्राने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता आमचा बेमुदत संप अटळ आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे ज्येष्ठ नेते ए. राजगोपाल, व्यंकटेश्वर यांनी दिली.

क्रीडा

‘आयसीसी’च्या समितीतून रवी शास्त्री पडले बाहेर
# भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी क्रिकेट समितीमधून राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने रवी शास्त्री यांनी माध्यम प्रतिनिधी पदाचा राजीनामा देऊन आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झालेले अनिल कुंबळे हे ‘आयसीसी‘च्या समितीचेही अध्यक्ष आहेत.

अर्थव्यवस्था

जागतिक बँकेचे सौर ऊर्जा क्षेत्रात एक अब्ज डॉलरचे साहाय्य
# पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा क्षेत्रात भारताचे उल्लेखनीय कार्य सुरू असल्याचे कौतुकोद्गार काढतानाच या क्षेत्राकरिता १ अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी जाहीर केले. गेल्या दोन दिवसांपासून भारत दौऱ्यावर असलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यांग किम यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मोदी सरकारचे भविष्यातही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासह अन्य काही क्षेत्रांना प्राधान्य असेल. पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील देशाची निर्भरता नजीकच्या कालावधीत कमी होईल, असा विश्वासही किम यांनी व्यक्त केला. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याचा भारतात सौर ऊर्जानिर्मितीसाठी उपयोगी होईल. छतावरील सौर पट्टीका, सौर उद्यानांसाठी लागणारी पायाभूत सुविधा, सौर राज्यांकरिता पारेषण वाहिन्या यांच्यासाठी हा निधी खर्च होईल.

स्विस बॅंकेत भारतीयांकडून ठेवण्यात येणाऱ्या पैशामध्ये लक्षणीय घट
# परदेशात ठेवण्यात येणाऱ्या काळ्या पैशांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने कडक पावले उचलल्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले असून, स्विस बॅंकेत भारतीयांकडून ठेवण्यात येणाऱ्या पैशामध्ये तब्बल एक तृतीयांश इतकी घट झाली आहे. स्विस बॅंकेत भारतीयांकडून १.२ अब्ज फ्रॅंक (सुमारे ८३९२ कोटी) इतकी रक्कम ठेवण्यात आल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमधील केंद्रीय बॅंकिंग प्राधिकरण स्विस नॅशनल बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, २०१५ पर्यंत स्विस बॅंकेत भारतीयांकडून जमा करण्यात आलेली रक्कम ५९.७४ कोटी स्विस फ्रॅंकने घटली आहे. १९९७ पासून स्विस बॅंकेकडून परदेशातील नागरिकांनी स्विस बॅंकेत ठेवलेल्या पैशांची माहिती जाहीर केली जाते. त्यावेळेपासून भारतीयांकडून इतक्या कमी प्रमाणात पैसा स्विस बॅंकेत जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्या वर्षी स्विस बॅंकेत भारतीयांकडून जमा होणारा पैसा कमी झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट
# देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा कपात करण्यात आली. त्यामुळे आता पेट्रोल प्रतिलीटरमागे ८९ पैसे आणि डिझेल प्रतिलीटरमागे ४९ पैशांनी स्वस्त होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदाच कपात झाली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या दरकपातीनंतर नवी दिल्लीत आता पेट्रोलचे दर ६४.७६ आणि डिझेलचे दर ५४.७० इतका असेल. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते.

TAGGED:
Share This Article